परभणी: विधानपरिषदेच्या परभणी – हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरण निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत सोमवारी(दि. १) एकूण सात नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले आहेत. उबाठा शिवसेनेच्या वतीने डॉ. विवेक नावंदर यांनी तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने सईद खान यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या वतीने उमेदवार आयात केल्या जाईल अशी चर्चा असतानाच रिंगणातील सर्व उमेदवार स्थानिकचेच असल्याचे स्पष्ट झाले.

दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांसह माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह जामकर, विश्वजित बुधवंत, संग्राम जामकर, मेहराज खान शेरगुल खान पठाण यांच्या अर्जांचा समावेश आहे. महाविकास आघाडीच्या वतीने डॉ. नावंदर यांचा अर्ज दाखल करताना खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, महापौर सय्यद इकबाल, काँग्रेसचे राष्ट्रीय सन्मन्वयक डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी आदींची उपस्थिती होती.

तर महायुतीच्या सईद खान यांचा अर्ज दाखल करताना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, राज्यमंत्री आणि पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, माजी आमदार सुरेश वरपूडकर, आमदार संजय बांगर आदींची उपस्थिती होती. परभणी हिंगोली विधानपरिषदेच्या जागेसाठी येत्या २१ जून रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी अंतिम मुदतीत सात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर उद्या मंगळवारी (दि.२) छाननी होणार असून संबंधितांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गुरुवारपर्यंत (दि. ४) अंतिम मुदत आहे.

मतदारसंघात ऐनवेळी कुठल्यातरी पक्षाकडून बाहेरून उमेदवार लादला जाईल याची चर्चा होती. विशेषतः शिंदे शिवसेनेच्या वतीने उमेदवार आयात केला जाईल अशी चर्चा असतानाच दोन दिवसांपूर्वी उबाठा शिवसेनेच्या वतीने एका बाहेरच्या पदाधिकाऱ्याच्या नावाची चर्चा सुरू झाली होती मात्र दोन्ही शिवसेनेने स्थानिक म्हणजे जिल्ह्यातलेच उमेदवार दिले आहेत.

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील यांचा उमेदवारी अर्ज या निवडणुकीसाठी दाखल झाला आहे. त्यामुळे निवडणुकीत नाट्य निर्माण झाले आहे. या उमेदवारी अर्जाबाबतही लवकरच चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे. विशेष म्हणजे हा उमेदवारी अर्ज दाखल होताना माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी नगराध्यक्ष अब्दुल हफिज, काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, उपमहापौर गणेश देशमुख, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे आदी उपस्थित होते.