परभणी : महाविकास आघाडीच्या वतीने परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची जागा उबाठा शिवसेनेला सोडली जाणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर आता या मतदारसंघात दोन शिवसेनेतच लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात रिंगणात आणखी एका ‘मालदार’ उमेदवाराचा शिरकाव व्हावा यासाठी मतदार कामाला लागले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही सोमवार (दि.१ जून) असल्याने आणखी दोन दिवसानंतर लढतीचे स्वरूप स्पष्ट होईल.

महायुतीच्या वतीने परभणी हिंगोलीची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटणार असल्याचे संकेत आहेत. भाजप व राष्ट्रवादी अजित पवार या दोन्ही पक्षांच्या वतीने काही नावांची चर्चा होत असली तरी या चर्चेला लगेचच पूर्णविराम मिळेल. त्यामुळे परभणी हिंगोली विधान परिषदेची लढत ही दोन शिवसेनेत होणार असली तरी या निवडणुकीत आणखी धनवान उमेदवार आल्याशिवाय चुरस वाढणार नाही याची मनोमन खात्री असलेल्या मतदारांनी आर्थिकदृष्ट्या मातब्बर असणाऱ्या एक दोन उमेदवारांना गळ घालायला सुरुवात केली आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणीत अकोल्याचे विप्लव बाजोरिया येतात आणि वयाच्या एकतिसाव्या वर्षी परभणी-हिंगोली विधान परिषदेचे आमदार होतात हा चमत्कार आठ वर्षांपूर्वी घडून आला होता. बाजोरिया यांच्या विजयापेक्षा सुरेश देशमुख यांच्या पराभवाची त्यावेळी चर्चा झाली होती. गेल्या निवडणुकीत बीडची जागा राष्ट्रवादीकडे घेण्याच्या तहात परभणीच्या जागेवर राष्ट्रवादीने पाणी सोडले होते. त्यावेळी बाबाजानी दुर्राणी यांचा या खेळात नाहक बळी गेला. राष्ट्रवादीची जागा काँग्रेसकडे हस्तांतरित झाल्यानंतर सुरेश देशमुख यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत उमेदवार ‘मालदार’ असावा लागतो. या निकषावर आघाडीच्या स्थानिक नेत्यांसह निवडणुकीतल्या मतदारांनाही त्यांची उमेदवारी प्रभावी वाटली होती.

एकीकडे आघाडीत जागा जशी काँग्रेसकडे हस्तांतरित झाली तशीच ती जागा वाटपात शिवसेनेने भाजपकडून घेतली. शिवसेनेच्या वतीने थेट अकोल्याहून विप्लव बाजोरिया यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत राजकीय पक्षाचा तसा संबंध नसतो. गेल्यावेळी या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांची संख्या २९७ एवढी असताना काँग्रेसचे उमेदवार सुरेश देशमुख यांना २२१ मते मिळाली होती. देशमुख यांचा पराभव झालाच कसा या प्रश्नाचे कोडे अजूनही उलगडलेले नाही. आता या सर्वच घडामोडींना पाहता पाहता आठ वर्षे उलटून गेले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शिंदे सेनेच्या वर्तुळात पुन्हा विप्लव बाजोरिया यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. गेल्यावेळी निवडून गेलेले बाजोरिया पुन्हा इकडे फिरकलेच नाहीत. हा त्यांच्या वरचा प्रमुख आक्षेप आहे. परभणी हिंगोलीतून बाजोरिया पुन्हा रिंगणात उतरले तर त्यांच्या तोडीस तोड आणखी एखादा उमेदवार निवडणुकीत उतरवावा यासाठी मतदारांनी देव पाण्यात ठेवले आहेत.