परभणी– हिंगोली मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने उबाठा पक्षाचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर तर महायुतीच्या वतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सईद खान हे निवडणुकीत आहेत. या निवडणुकीत एकूण सात उमेदवारी अर्ज असले तरी प्रामुख्याने माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशीलकुमार आणि विजय जामकर या दोन अर्जांच्या अनुषंगाने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सुशीलकुमार देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते सोबत होते. ही उमेदवारी किती गांभीर्याने असेल याबाबत उत्सुकता आहे. महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी छुपे मतभेद मोठ्या प्रमाणावर आहेत.
सईद खान हे महायुतीचे उमेदवार असले तरी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार राजेश विटेकर यांचे ते पाथरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय विरोधक आहेत. शिवाय परभणी- हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीचे मतदारांचे संख्याबळ सर्वाधिक आहे. अशावेळी विटेकर हे सईद खान यांना मदत करतील याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीचा उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार संजय जाधव हे सोबत असले तरी प्रत्यक्षात खासदार जाधव यांची भूमिका काय राहते यावरही बरेच काही अवलंबून आहे.
खासदार जाधव हे गेल्या काही दिवसांपासून उबाठा पक्षाशी अंतर ठेवून आहेत. सईद खान यांच्या उमेदवारी बाबत सुरेश वरपूडकर यांची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे. दोन्ही शिवसेनेचे उमेदवार रिंगणात राहिले तर निवडणुकीत चुरस निर्माण होणार नाही. तिसरा प्रबळ उमेदवार रिंगणात असल्याशिवाय निवडणुकीत रंगत येणार नाही आणि मतदारांचाही भाव वाढणार नाही अशी अनेकांची अटकळ आहे. त्यादृष्टीने तिसऱ्या उमेदवारीला खतपाणी देणे सध्या सुरू आहे. सईद खान यांच्या विषयी हरकत असणारे महायुतीतल्याच पक्षांचे काही नेते आणि नावंदर यांना छुपा विरोध करणारे महाविकास आघाडीतले काही नेते असे दोन्ही बाजूंचे नेतेही तिसऱ्या उमेदवारीला पडद्याआडून बळ देत आहेत.
काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख हे याच निवडणुकीत गेल्यावेळी पराभूत झाले होते. आता त्यांच्या चिरंजीवांचा उमेदवारी अर्ज असला तरी ही आपली बंडखोरी नाही असे सुशीलकुमार देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. आपण काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते अथवा पदाधिकारी नाहीत त्यामुळे आपली उमेदवारी ही बंडखोरी नाही असे त्यांनी जाहीर केले आहे. या सर्व परिस्थितीत परभणी- हिंगोली विधान परिषद निवडणुकीतील गुंतागुंत वाढली आहे. तिसरा उमेदवार पूर्ण तयारीनिशी आखाड्यात उतरविण्यासाठी महाविकास आघाडी व महायुतीतल्याच काही नेत्यांनी प्रयत्न सुरू केले असले तरी हे प्रयत्न यशस्वी होतात की दोन्ही शिवसेनेतच सरळ सामना होतो हे लगेचच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.
