परभणी : परभणी हिंगोली विधान परिषदेसाठी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून आता केवळ उमेदवारांच्या हाती दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. मतदान जवळ आल्यानंतर मतदारांच्या अर्थपूर्ण गाठीभेटींसह आपापले मतदार सुरक्षित करण्याकडे उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे. महायुतीचे उमेदवार सईद खान, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर, अपक्ष उमेदवार सुशीलकुमार देशमुख हे तिघे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सुरुवातीला स्थानिक पातळीवर महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका पार पडल्या. त्यात आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन करण्यात आले. तथापि थेट मतदारांशी कोणताही उमेदवार संपर्क साधत नसल्याने मतदारांमध्ये अस्वस्थता दिसून येत होती. आता शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी गती घेतली आहे. या निवडणुकीत मतांच्या भावाची उघड उघड चर्चा होत असून मतदार तिन्ही उमेदवारांकडून ‘अर्थ’पूर्ण भेटीच्या प्रतीक्षेत आहेत. या स्पर्धेत कोणता उमेदवार प्रभावी ठरतो यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे.
विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात असून मतदानासाठी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील महसूल उपविभागांच्या ठिकाणी एकूण सात मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
मतदान गुरुवारी (दि. १८) सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. मतदानासाठी येताना मतदारांनी स्थानिक प्राधिकरणाकडून देण्यात आलेले ओळखपत्र अथवा भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या पुराव्यांपैकी एक पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे.
या निवडणुकीमध्ये एकूण ४६६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यापैकी २५३ स्त्री मतदार तर २१३ पुरुष मतदार आहेत. या मतदारांमध्ये जिल्हा परिषद परभणीचे सर्व सदस्य, जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती, शहर महानगरपालिकेचे सर्व सदस्य तसेच परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतांचे अध्यक्ष आणि सदस्य यांचा समावेश आहे. मतदान केंद्राचे ठिकाण व मतदान केंद्रात जोडण्यात आलेल्या स्थानिक प्राधिकरणाचे नाव आणि मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
तहसीलदार कार्यालय, परभणी येथे सर्व पंचायत समिती सभापतींसह जिल्हा परिषद व शहर महानगरपालिकेच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे १२८ मतदार मतदान करणार आहेत. तहसीलदार कार्यालय, सेलू येथे नगर परिषद सेलू व नगर परिषद जिंतूरच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र असून येथे ५९ मतदार मतदान करतील. उपविभागीय अधिकारी कार्यालय, तळ मजला, संजय गांधी विभाग, गंगाखेड येथे नगर परिषद गंगाखेड, नगर पंचायत पालम आणि नगर परिषद पूर्णा येथील सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे ७३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
तहसीलदार कार्यालय, पाथरी येथे नगर परिषद पाथरी, नगर परिषद मानवत आणि नगर परिषद सोनपेठ येथील सदस्यांसाठी मतदान केंद्र असून येथे ७४ मतदार मतदान करतील. तहसीलदार कार्यालय, हिंगोली येथे नगर परिषद हिंगोली व नगर पंचायत सेनगावच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे ५८ मतदार आहेत.
तहसीलदार कार्यालय, कळमनुरी येथे नगर परिषद येथे २३ मतदार मतदान करतील. तर तहसीलदार कार्यालय, वसमत येथे नगर परिषद वसमत व नगर पंचायत औंढा नागनाथच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे ५१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत अशी माहिती देण्यात आली. दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि.२२) जिल्हाधिकारी कार्यालय, येथील तळमजल्यावरील हॉल क्रमांक १ मध्ये होणार आहे.
