परभणी: जिल्ह्यातील जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निलज शिवारात अवैधरित्या वाळू उत्खनन करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी सोमवारी (दि. २)धडक कारवाई केली. या कारवाईत नदीपात्रातून ३ टिप्पर, जेसीबी, ट्रॅक्टर आणि १० ब्रास वाळू असा एकूण ८७ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी जिंतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड पोलिस परिक्षेत्राच्या पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाला परभणी जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरुद्ध अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलीस उपमहानिरिक्षक पथकाने ही कारवाई केली.

जिंतूर तालुक्यातील निलज शिवारातील वाळू धक्क्यावर सोमवारी अचानक छापा टाकला असता अवैध रेती उत्खनन आणि वाहतुक करून इंजिन बोटच्या सहाय्याने नदीपात्रातून वाळू उपसा करून नदीकिनारी आणली जात असल्याचे पोलीस पथकाच्या निदर्शनास आले. नदीपात्रातून तीन टिप्पर, जेसीबी, ट्रॅक्टर, चाळणी आणि नदीपात्रातून बाहेर काढून ठेवलेली दहा ब्रास वाळू असा एकूण ८७ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीस पथकाने जप्त केला. ही कारवाई पोलीस उपमहानिरीक्षक पथकातील पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस हवालदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे, गजानन डवरे यांच्या पथकाने केली. पथकाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अमलदारांचे अभिनंदन केले आहे.

जिंतूर परिसरात अवैध वाळू उपशावर छापा

अवैध व्यवसायाची माहिती थेट पोलिसांना पोचविता यावी यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ९१ ५०१००१०० हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे केले आहे.