परभणी : देवदर्शनासाठी उज्जैनकडे (मध्यप्रदेश) निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा तालुक्यातील अकोली पुलाजवळ गुरूवारी (दि. १२) मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.
गंगाखेड येथील पाच भाविक उज्जैन येथील धार्मिक तीर्थस्थळी दर्शनासाठी गंगाखेडहून जिंतूरमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. जिंतूर शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील अकोली पुलाजवळ वाहन चालकाचा ताबा सुटल्याने अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघात इतका भीषण होता की, आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख मुद्दसीर व रुग्णकक्ष सेवक गंगाधर पालवे यांनी तपासणी केल्यानंतर बालाजी आश्रोबा औटी(वय २८) रा. खडकपुरा, बालाप्रसाद उत्तमराव घोरपडे(वय ३०) रा. तारुमोहल्ला, कृष्णा बालाजी गुट्टे(वय २८) रा. कोद्री रोड, रोहन संजय राठोर(वय २७) रा. लक्ष्मीनगर या चौघांना मृत घोषित केले. तर गोपाळ गणेश रोकडे (वय २८) रा. खडकपुरा हा अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, बिट जमादार दत्तात्रेय गुंगाणे, मेजर थोरवे व वाहनचालक पैठणे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने गंगाखेड व जिंतूर परिसरात शोककळा पसरली आहे. जिंतूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. बिट जमादार दत्तात्रय गुंगाणे यांच्या फिर्यादीवरून चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक विजय जाधव करीत आहेत.
