परभणी : कामगार भवनाच्या माध्यमातून कामगार वर्गाला सर्व प्रशासकीय सेवा एकाच छताखाली तत्परतेने मिळतील. तसेच या भवनामुळे कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजना, नोंदणी प्रक्रिया, लाभांचे वितरण, आरोग्य सेवा, सुरक्षा उपाययोजना तसेच इतर कल्याणकारी कार्यक्रम अधिक सुटसुटीत, पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने राबविता येतील, असे प्रतिपादन राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

शहरात आज कामगार भवन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, कामगार आयुक्त एच.पी. तुम्मोड, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे, सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड, उपविभागीय अभियंता बी.एम. शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, कामगार भवनाची नवी इमारत ही जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाचे पाऊल ठरणार आहे. राज्य शासनाच्यावतीने सर्वसामान्य कष्टकरी कामगारांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या जातात. कामगारांच्या कुटुंबांना उत्तम शिक्षण, आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सहाय्य केले जाते. कामगारांचे जीवनमान उंचविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून परभणी जिल्ह्यात कामगार भवन उभारले जात आहे. कामगार विभागाची नवीन इमारत पूर्ण झाल्यावर कामगार वर्गासाठी सुसज्ज कार्यालय उभारले जाईल आणि या कार्यालयातून कामगारांना उत्तम सेवा मिळतील आणि या विभागाचे काम अधिक गतिमान व सुलभ होईल.

कामगार भवनाकरीता एकूण अकरा गुंठे जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून १४ कोटी ५८ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. ही इमारत तीन मजली असणार आहे. यामध्ये अंतर्गत फर्निचर, बागबगीचा, संरक्षण भिंत, अग्नीरोधक यंत्रणा, अंतर्गत बाह्य विद्युतीकरण व अनुषंगीक बाबी राहणार आहेत.