परभणी : मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आणि जिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या संकटामुळे खासदार संजय जाधव प्रणित राजे संभाजी मित्र मंडळाने दरवर्षी होणारा ‘माखनचोर दहीहंडी उत्सव’ रद्द केला आहे. येथे प्रतिवर्षी हा उत्सव जोरदार साजरा होतो.
तीन दिवसांपूर्वी परभणीत खासदार संजय जाधव यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. ३० ऑगस्ट) शेतकरी व युवा संवाद मेळावा आयोजित केला होता. हा मेळावा रद्द करा असे त्याच दिवशी सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी सुचवले होते. जरांगे पाटील यांच्या विषयी आपल्या मनात आदर आहे पण आता अचानक मेळावा रद्द करणे शक्य होणार नाही अशी भूमिका खासदार जाधव यांनी घेतली होती. त्यावरून माध्यमांमध्ये जोरदार चर्चा झाली होती तसेच या मेळाव्यावरही वादंगाचे सावट पसरले होते. खासदार जाधव यांच्या पुढाकाराने दरवर्षी माखनचोर दहीहंडी उत्सव होतो. भव्य आयोजनामुळे या उत्सवाचे सर्वदूर ख्याती आहे. मात्र जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर हा दहीहंडी उत्सव यंदा रद्द करण्यात आल्याचे खासदार जाधव यांच्या वतीने सांगण्यात आले.
जिल्ह्यात मागील ३२ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. पिकांची वाढ खुंटली असून, बळीराजा चिंतेत आणि हवालदिल झाला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या दुःखाशी एकरूप होत हा उत्सव रद्द झाल्याचेही सांगण्यात आले आहे. दहीहंडी हा केवळ उत्सव नसून तो आनंद, एकजूट आणि सामाजिक सहभागाचे प्रतीक आहे. मात्र पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात असेल तर उत्सव साजरा करण्यापेक्षा त्याच्या दुःखात सहभागी होणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे असे खासदार जाधव यांच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
उत्सवापेक्षा समाजाचे प्रश्न आणि संवेदनशीलता महत्त्वाची
समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. समाजाच्या भावना आणि शेतकरी बांधवांची विदारक परिस्थिती लक्षात घेता, यंदा उत्सवापेक्षा शेतकरी आणि समाजाच्या प्रश्नांशी संवेदनशीलपणे उभे राहणे अधिक महत्त्वाचे आहे, अशी भूमिका राजे संभाजी मित्रमंडळाने घेतली आहे. – संजय जाधव, खासदार, परभणी</strong>
