परभणी : मानवत तालुक्यातील यशवाडीजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर आज शनिवारी (दि.९) दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. दर्शन करून परतणाऱ्या दुचाकीस्वार दाम्पत्याला एसटीच्या लालपरी बसने जोरदार धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

मृतांमध्ये अनिल लक्ष्मणराव जाधव (वय ५५) व आशामती अनिलराव जाधव (वय ५०)रा. खांडवी वडी, ता. परतूर, जि. जालना यांचा समावेश आहे. ते दुचाकी क्रमांक एमएच २० एफए ७५६८ वरून प्रवास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, परभणीहून बीडकडे जाणारी बस क्रमांक एमएच १४ एमएच १५६१ यशवाडी येथील हनुमान मंदिराजवळून राष्ट्रीय महामार्गावर आलेल्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडकली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकी सुमारे १०० ते १२५ मीटरपर्यंत बससोबत फरफटत गेली. यात दोघेही बसच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी अत्यंत हृदयद्रावक दृश्य निर्माण झाले. मृतांच्या शरीराचे अवयव रस्त्यावर विखुरल्याने उपस्थित नागरिक हादरले.

बसमधील प्रवासी माधव लिंबाजी गिराम (रा. अमडापूर, ता परभणी) यांनी सांगितले की, बसचा वेग जास्त असल्याने चालकाला वाहनावर नियंत्रण मिळवता आले नाही. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. तसेच धडकेनंतर दुचाकीला आग लागण्याची भीती निर्माण झाल्याने काही प्रवाशांनी बसचा दरवाजा तोडून बाहेर पडल्याचे त्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, पोलिस उपनिरिक्षक किशन पतंगे, प्रमोद देवकते, अनिल खिल्लारे, पोलीस हवालदार अतुल पंचांगे व दत्ता माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह रुग्णवाहिकेतून कोल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.