परभणी : शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडी संदर्भात राजकीय हालचालींना वेग आला असून उद्या गुरुवारी (दि. १२) येथील बी. रघुनाथ सभागृहात जिल्हाधिकारी तथा पिठासीन आधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेत निवड बैठक आयोजित करण्यात आली आहे. सत्तेवर दावा सांगणाऱ्या उबाठा शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांचे नगरसेवक सध्या सहलीवर असून उबाठा सेनेच्या नगरसेवकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली तर काँग्रेसचे नगरसेवक हे तेलंगणात आहेत. या दोन्ही पक्षांचे नगरसेवक नाट्यमयरीत्या उद्या गुरुवारी (दि.१२) शहरात दाखल होतील. निवड कोणाची होणार याबाबत दोन्ही पक्षांनी कमालीची गुप्तता पाळली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी बुधवारी मातोश्रीवर पोहोचले. आमदार डॉ. राहुल पाटील, महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पक्षप्रमुखांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना यावेळी मार्गदर्शन केले.

दरम्यान काँग्रेस पक्षाचे नगरसेवक तीन दिवसांपूर्वी हैदराबाद इथे रवाना झाले. कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी मोठी खबरदारी घेतली असून आपापले नगरसेवक सुरक्षित स्थळी ठेवले आहेत. महापालिकेतील सर्वच राजकीय पक्षांनी यापूर्वीच आपापले गटनेते जाहीर केले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिरूमला मुकुंद खिल्लारे, शिवसेना उबाठा पक्षाच्यावतीने दिलीप ठाकूर तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने विजय जामकर गटनेते म्हणून निवडले गेले आहेत. काँग्रेस पक्षाने गुलमीर खान यांची गटनेतेपदी निवड जाहीर केली आहे.

या चारही निवडी जाहीर झाल्यानंतर आता महापौर, उपमहापौरपदासाठी वेगवेगळ्या नावांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. किंबहुना जे गटनेते निवडले गेले त्यापेक्षा वेगळ्या नावांची निवड महापौर, उपमहापौर या पदांसाठी होईल असे तर्क लढवले जात आहेत.

महापालिकेत शिवसेना २५, काँग्रेस १२, भाजप १२, राष्ट्रवादी ११, अपक्ष ३, यशवंत सेना १ असे पक्षीय बलाबल आहे. ठरल्याप्रमाणे शिवसेना व काँग्रेसची आघाडी अपेक्षित असली तरी महापालिकेत राष्ट्रवादीची भूमिका काय राहणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शिवसेनेतही महापौरपदाच्या अनुषंगाने दोन मतप्रवाह आहेत. खासदार संजय जाधव व आमदार राहुल पाटील या दोघांचे वजन नेमके कोणाच्या पारड्यात जाते यावरही बरेच काही अवलंबून आहे. महापौरपदी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्यात यावे असाही एक प्रवाह असून या बाबीला काही नगरसेवकांचा विरोध असल्याची चर्चा आहे. शिवसेनेने महापौरपदाचा उमेदवार हिंदू दिल्यास काँग्रेस उपमहापौर पदासाठी मुस्लिम नगरसेवकास प्रतिनिधित्व देईल जर शिवसेनेचा महापौर पदाचा उमेदवार मुस्लिम ठरला तर उपमहापौर पद काँग्रेस पक्षाकडून हिंदू नगरसेवक दिले जाईल असा सामाजिक समतोल दोन्ही पक्ष साधतील असाही एक मतप्रवाह आहे या सर्व पार्श्वभूमीवर उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.