परभणी : ‘दुष्काळामुळे दसरा दिवाळी आधीच मराठवाड्यातून मजुरांचे स्थलांतर’ या विदारक वस्तुस्थितीकडे ‘लोकसत्ता’ने लक्ष वेधल्यानंतर प्रशासकीय पातळीवरूनही याबाबतचे गांभीर्य लक्षात घेतले जात असून वैयक्तिक आणि सार्वजनिक अशा दोन स्वरूपाची कामे मजुरांच्या मागणीनुसार उपलब्ध करून दिली जातील असे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले.
सध्या ग्रामीण भागात तुरळक प्रमाणात सोयाबीन काढणी व कापूस वेचणीची कामे सुरू असली तरी आणखी आठ ते दहा दिवसानंतर रोजगाराचा प्रश्न तीव्र होणार असून जे रोजगारासाठी स्थलांतर करू शकत नाहीत त्यांना गावातच काम उपलब्ध करून देण्याची मागणी पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात सिंचन विहीर, गोठे, जलतारा अशी विविध कामे उपलब्ध करून दिली जातील. वैयक्तिक योजनांमधून ३७ लाख मनुष्य दिवसाचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो तर सार्वजनिक कामांमधून ६२ हजार ७८२ दिवसांचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. कामांची मागणी झाल्यास लगेच ती उपलब्ध करून दिली जातील असे जिल्हाधिकारी चव्हाण ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले.
मागेल त्याला काम या उद्देशाने रोजगार हमी योजनेचा कायदा महाराष्ट्रात निर्माण झाल्यानंतर पुढे ‘मनरेगा’च्या रूपात हा कायदा केंद्र स्तरावर अस्तित्वात आला. अलीकडेच VB GRAMJ या नावाने त्याचे नवे प्रारूप निश्चित झाले. या कायद्याने रोजगाराची हमी मजुरांना उपलब्ध झाली असली तरी मजुरीतील विलंब, बनावट नोंदणी, भ्रष्टाचार, प्रशासकीय अडचणी अशा काही बाबींमुळे सुरुवातीपासूनच ‘रोहयो’सारखी योजना सतत चर्चेत राहिलेली आहे.
ठराविक मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगार भत्ता देण्याची तरतूदही या कायद्यात असल्याने तो मजुरांसाठी महत्त्वाचा असला तरी अनेक कामे यंत्राद्वारे करायची आणि ती मजुरांच्या नावे दाखवायची असा प्रकार सातत्याने या योजनेत घडतो. सध्या ३१७ रुपये दिवसाच्या मजुरीचा दर आहे. त्यामानाने खाजगी क्षेत्रात कामाचा मोबदला अधिक मिळतो त्यामुळे मजूरही ‘रोहयो’च्या कामावर फारसे उत्सुक नसतात. यंदा मात्र कोंडी निर्माण झाल्याने रोहयोची कामे वाढण्याची चिन्हे आहेत.
मजुरांनी कामाची मागणी करायची आणि अधिकाऱ्यांनी मजूर रोजगार हमीच्या कामावर यायला तयार नाहीत असे म्हणायचे हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून चालत असला तरी यंदा मात्र राज्यात रोजगार हमीच्या कामांची मागणी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
गावातच रोजगार का ?
सध्या छत्रपती संभाजीनगर येथे तुटपुंज्या रोजगाराच्या आधाराने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या रवी नवले याची आई सुमनबाई जगन्नाथ नवले (वय ५५) आणि आजी इंदुबाई मुंजाजी नाईक (वय ७८) या दोघी साडेगाव (तालुका परभणी) येथे राहतात. घरी सव्वा एकर जमिनीचा तुकडा आहे. त्यात गुजराण कशी व्हायची ? यंदा तर सोयाबीन पूर्णपणे करपून गेले आहे.
माझी आजी आणि आई रोजगारासाठी बाहेर कशा पडणार ? त्यांना गावातच काम मिळाले पाहिजे असे रवीने सांगितले. सध्या तलाठी पदाच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या रवीला या परीक्षेनंतर कशासाठी शहरात राहायचे असा प्रश्न पडतो पण त्याचवेळी गावी जाऊन तरी काय करणार या प्रश्नाने तो सध्या अस्वस्थ असल्याचे त्याच्या बोलण्यातून कळते.
रोजगार न मिळाल्यास असंतोषाचा भडका
देशाला ‘रोहयो’चा कायदा देणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेला रोजगारासाठी वणवण करावी लागणे हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या आराखड्यासाठी आणि भूसंपादनासाठी मंत्रिमंडळाने २०,७८७ कोटी रुपये मंजूर केले आहेत परंतु दुष्काळग्रस्त जनतेच्या रोजगारासाठी ‘मग्रारोहयो १९७७’ या कायद्यानुसार एक रुपयाचीही तरतूद नाही. भविष्यात रोजगार न मिळाल्यास ग्रामीण भागात असंतोषाचा भडका उडेल.- राजन क्षीरसागर, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा, नवी दिल्ली.
