परभणी : दोन महिन्यापूर्वी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, एकदा जाहीर करूनही कार्यक्रम रद्द करावा लागला होता अशा परिस्थितीत ऐनवेळी कार्यक्रम रद्द करा असे सांगितल्यानंतर मी येणाऱ्या लोकांना काय उत्तर देणार ? असे स्पष्ट करून खासदार संजय जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांची माफी मागितली. प्राप्त परिस्थितीत कार्यक्रम रद्द करणे शक्यच नव्हते त्यामुळे भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो असे त्यांनी येथील जाहीर सभेत सांगितले. तुमच्यासोबत कालही होतो, आजही आहे आणि उद्याही राहील असे ते म्हणाले.

येथील स्टेडियम मैदानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज रविवारी (दि.३०) शेतकरी व युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा रद्द करावा अशी सूचना आज सकाळी मनोज जरांगे यांनी आयोजक खासदार जाधव यांना केली होती. त्यानंतर मेळावा रद्द होऊ शकणार नाही असेही खासदार जाधव यांनी स्पष्ट केले होते. या वादंगाचे सावट आजच्या मेळाव्यावर होते. दुपारी एक वाजता मेळाव्याची नियोजित वेळ असताना शिंदे यांचे दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी सभास्थानी आगमन झाले.

मेळाव्याचे आयोजक या नात्याने आपल्या प्रास्ताविकात खासदार संजय जाधव यांनी परभणी जिल्ह्यातील काही विकास प्रश्नांचा आढावा घेतला. पुण्याच्या बालेवाडीच्या धर्तीवर येथील कृषी विद्यापीठाच्या जमिनीवर बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारण्यात यावे, शहराला बाभूळगाव, उजळंबा या परिसरात नवीन औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात यावी, पावसात मोठा खंड असल्याने शेतकरी चिंतेत आहेत अशावेळी त्यांना दिलासा देणारे निर्णय घ्यावेत असे खासदार जाधव यांनी आपल्या भाषणात सुरुवातीला स्पष्ट केले. त्यांनी आपल्या मनोगतात शेवटी मनोज जरांगे यांची माफी मागितली.

तुमच्याविषयी मनात आदराची भावना आहे, तुम्ही मला बोललात त्याचे मला कणभरही दुःख नाही. आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला आहे. हा कार्यक्रम दोन महिन्यापूर्वी घोषित झालेला होता. सकाळपासूनच लोक सभेच्या ठिकाणी आलेले होते. यापूर्वी एकदा कार्यक्रम रद्द झाला होता. आता पुन्हा रद्द करणे शक्य नव्हते. कार्यक्रम रद्द झाला असता तर मला अनेक संकटांचा सामना करावा लागला असता. तरीही तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो असे खासदार जाधव आपल्या भाषणात म्हणाले.