परभणी : दोन वेळा आमदारकी आणि तीन वेळा खासदारकी मिळवलेल्या तसेच शिवसेनेच्या फाटाफुटीतही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या खासदार संजय जाधव यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेने जिल्ह्यातले राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
अलीकडेच मातोश्रीवर झालेल्या खासदारांच्या बैठकीला जाधव यांची अनुपस्थिती राहिल्याने ही चर्चा आणखीच जोरात सुरू झाली. सातत्याने विरोधी पक्षात राहिल्याने आता उरलेल्या तीन वर्षात तरी सत्तेच्या सावलीत जावे असा विचार खासदार जाधव करत असल्याचे मानले जात आहे.
उबाठा शिवसेनेत निष्ठावंत राहिलेल्या खासदार जाधव यांच्यासमोर एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेचा पर्याय सध्या समोर असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. खासदार जाधव यांच्या समवेत आणखीही काही खासदार शिंदे सेनेत दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्षात राहून कामे होत नाहीत, कामे झाली नाही तर कार्यकर्ते टिकणार कसे असा युक्तिवाद खासदार जाधव यांचे समर्थक खाजगीत करू लागले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनेक पक्षांतरे झाली मात्र जिल्ह्यात स्वतःचा राजकीय दबदबा असलेल्या जाधव यांच्या पक्षांतराची चर्चा सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.
२००४ च्या निवडणुकीत अशोक देशमुख यांचा तर २००९ च्या निवडणुकीत विखार अहमद खान यांचा पराभव करीत संजय जाधव यांनी दोन वेळा परभणी विधानसभा मतदारसंघातून विजय संपादन केला. विधानसभा निवडणुकीत परभणीत होणाऱ्या ‘खान हवा की बाण’ या धार्मिक ध्रुवीकरणाच्या विभागणीचेही या विजयामागे एक प्रमुख कारण आहे.
दोन वेळा मिळालेल्या आमदारकीनंतर खासदार जाधव यांना पक्षाने बढती दिली. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजय भांबळे यांचा पराभव करून ते निवडून आले तर २०१९ साली झालेल्या निवडणुकीत त्यांनी राजेश विटेकर यांना पराभूत केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीने महादेव जानकर यांना उमेदवारी दिली. खासदार संजय जाधव हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले.
महाविकास आघाडीच्या वतीने जाधव यांची उमेदवारी होती. ही निवडणूकही जाधव यांनी जिंकली. अशाप्रकारे जाधव यांची खासदारकीची हॅट्रिक झाली.
कट्टर शिवसैनिक असलेल्या खासदार जाधव यांची सुरुवात शाखाप्रमुख, शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख झालेली आहे. राजे संभाजी मित्र मंडळाची स्थापना करत या मंडळाच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा, नवरात्र उत्सव आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी तरुणांची मोठी फळी निर्माण केली. जो खासदार निवडून येतो तो पक्षाशी द्रोह करतो अशी परभणी लोकसभा मतदारसंघाची ख्याती असताना खासदार जाधव मात्र ठामपणे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. पक्षाने त्यांना उपनेतेपदी स्थान दिले आहे. लोकसभा निवडणुकीला आणखी तीन वर्षे बाकी असताना खासदार जाधव यांच्या पक्षांतराची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
काही दिवसांपूर्वीच एका मुस्लिम कार्यकर्त्याचा खासदार जाधव यांच्याशी संवाद झाल्याची एक ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली. मुस्लिम समाजाने तुम्हाला भरभरून मतदान दिले आहे. तुम्ही पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसे झाले तर तो मुस्लिम समाजाचा फार मोठा विश्वासघात ठरेल असे या कार्यकर्त्याने खासदार जाधव यांना म्हटले आहे. यावर आम्हीही मुस्लिम महापौर देऊन या मदतीची परतफेड केली आहे असे खासदार जाधव या कार्यकर्त्याला म्हणाले आहेत. मात्र आपण पक्षांतर करणार नाही असे या संवादात ते ठामपणे कुठेही म्हणाले नाहीत.
एकीकडे खासदार संजय जाधव हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत.
केंद्रीय रेल्वेमंत्री तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांची भेट झाल्याची छायाचित्रे माध्यमांवर आली. त्यामुळे खासदार जाधव यांच्याकडून भाजपच्या पर्यायाचीही चाचपणी केली जात आहे काय असेही कुतूहल जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या वर्तुळात आहे. या संदर्भात खासदार जाधव यांची प्रतिक्रिया घेतली पक्षांतराबाबत वावड्या उठत असल्या तरी आज तरी मी त्याच ठिकाणी आहे. पुढचे पुढे पाहू असे खासदार जाधव म्हणाले.
परंपरा चालवणार का?
जो खासदार निवडून येतो तो पक्षाशी द्रोह करतो असा आजवरचा शिवसेनेचा इतिहास आहे. दिवंगत अशोक देशमुख यांच्यासह गणेश दुधगावकर, तुकाराम रेंगे पाटील, सुरेश जाधव या चारही नेत्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. खासदार जाधव यांनी ही परंपरा खंडित करून सेनेशी एकनिष्ठ राहत जिल्ह्यात दीर्घकाळ राजकारण केले. मात्र सेनेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जर खासदार जाधव यांनी घेतला तर आधीची परंपरा पुढे नेल्यासारखे होईल.
