परभणी : खासदार संजय जाधव यांच्या उबाठा शिवसेनेशी पक्षद्रोह करण्याच्या भूमिकेचे जिल्ह्यात पडसाद उमटायला प्रारंभ झाला आहे. खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीनंतर निष्ठावान शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. सोनपेठमध्ये शिवसैनिकांनी आक्रमक होत खासदार संजय जाधव यांच्याविरोधात तीव्र जोडेमार आंदोलन केले आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी खासदार जाधव यांची प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढली. दरम्यान खासदार जाधव यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात ‘बंडू बॉस’ या नावाने परिचित असलेल्या खासदार जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी तातडीने दिल्ली गाठली. त्यानंतर ते उबाठा शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होत असल्याच्या बातम्या प्रचंड वेगाने पसरल्या. खासदार जाधव यांच्या भूमिकेबाबत सध्या समाजमाध्यमांवर टीकेची प्रचंड झोड सुरू आहे. सोनपेठ येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यालयाबाहेर आज सकाळपासूनच शिवसैनिक गोळा होत असल्याचे दिसून आले. संतप्त कार्यकर्त्यांनी थेट खासदार संजय जाधव यांच्या छायाचित्राला चपलांचा हार घातला. तेथूनच त्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

‘गद्दार संजय जाधव’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी हा मोर्चा शहराच्या मुख्य भागात आणला. शहरातील प्रमुख मार्गाने ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खासदार संजय जाधव यांच्या प्रतिमेचे जाहीर दहन करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर शिवसैनिकांच्या घोषणांनी दणाणून गेला. खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीमुळे परभणी जिल्ह्यातील निष्ठावान शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, आम्ही फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंसोबतच आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

हे आंदोलन शिवसेनेचे विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार कल्याणराव रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या आंदोलनाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृष्णा पिंगळे, तालुका प्रमुख संतोष गवळी, शहरप्रमुख अमोल दहीवाळ, श्रीकृष्ण साठे, रामेश्वर पांडूळे, बागुल शेख, संजय जाधव, गणेश जोशी, भास्कर भोसले, वैभव यादव, तुकाराम साठे, सिध्देश्वर आव्हाड, गणेश यादव, तेजस भोसले, इम्रान सय्यद, ज्ञानेश्वर परसे, वैभव सुरवसे, गोपाळ भोसले, फेरोज पठाण, अशोक सुरवसे, सुदर्शन बदाले, रमेश उंडाळकर, महादेव तुपस्मिंद्रे, गौतम शिंदे, महेश भोसले, विनोद यादव, माऊली शिंदे आदी शिवसैनिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

परभणीत निवासस्थानाबाहेर बंदोबस्त

खासदार संजय जाधव यांच्या बाळासाहेब ठाकरे नगरातील सद्गुरूकृपा या निवासस्थानी सध्या मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. दरम्यान खासदार संजय जाधव यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यासंदर्भात गृह विभागाने पोलीस अधीक्षकांना आदेश दिल्याचीही माहिती आहे.