नांदेड: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५६ पदांच्या भरतीची प्रक्रिया गतवर्षी सुरू होण्यापूर्वीच या जागांची आपसांत वाटणी करून घेणार्या या बँकेच्या माजी संचालकांपुढे शेजारच्या परभणी जिल्हा बँकेने कर्मचारी भरतीच्या विषयात चांगल्या अर्थाने ‘आदर्श’ घालून दिला आहे. या बँकेतील कर्मचारी भरतीची प्रक्रिया ‘आयबीपीएस’ या अव्वल संस्थेमार्फत पूर्ण झाल्यानंतर कोणतीही तक्रार झाली नाही. शासन आदेशातील ‘पारदर्शी’पणा हा शब्द त्यांनी कृतीतून उतरविला.
नांदेड जिल्हा बँकेचे मागील वादग्रस्त संचालक मंडळ अलीकडेच बरखास्त झाले. आपल्या काळात नोकरभरती करण्याचे भाग्य या मंडळाला लाभले नाही. कारण शासनाच्या सहकार विभागाने एकंदर रागरंग बघून या बँकेतील कर्मचारी भरती गेल्या ऑक्टोबर महिन्यात थांबविली होती; पण या बँकेतील त्याआधीच्या घडामोडी, अध्यक्ष वगळता इतर संचालकांनी निश्चित करून घेतलेला ‘आपला कोटा’ इत्यादी बाबी राज्यभर गाजल्यानंतर जिल्हा बँकांमधील नोकरभरती संदर्भात सहकार विभागाला नव्याने काही निर्णय घ्यावे लागले.
शासनाच्या नव्या निर्णयानुसार जिल्हा बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता आयबीपीएससह टीसीएस आणि एमकेसीएल या तीनच नामांकित संस्थांना मान्यता देण्यात आली असून परभणी बँकेच्या प्रशासनाने आपल्या १५१ पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्याची संपूर्ण जबाबदारी आयबीपीएसकडे सोपविली होती. या संस्थेने काही महिन्यांपूर्वी विविध ठिकाणच्या ३७ केंद्रांवर सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. त्यातून एका पदामागे चार याप्रमाणे सहाशेहून अधिक उमेदवार १० गुणांच्या मौखिक मुलाखतींसाठी पात्र ठरविले.
सध्या नांदेडसह परभणी बँकेतही संचालक मंडळ निवडणूक प्रक्रिया जारी आहे; पण परभणी बँकेतील भरती प्रक्रिया नवे संचालक मंडळ येण्यापूर्वीच कटकटी आणि हस्तक्षेपाविना पूर्ण झाली. निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर कोणाचीही तक्रार आमच्यापर्यंत आली नाही. निवडलेल्या उमेदवारांतील १३० जणं आपापल्या जागी रुजू झाले असून काही उमेदवारांनी मुदत मागून घेतली असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंदकर यांनी सांगितले.
कुरुंदकर हे स्वतः अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर आहेत. परभणी बँकेत श्रेणी-१ अधिकारी पदापासून त्यांची कारकीर्द सुरू झाली. नंतर ते मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. या बँकेमध्ये त्रयस्थ संस्थेमार्फत प्रथमच झालेल्या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांमध्ये तब्बल ४० उमेदवार अभियांत्रिकी शाखेतील वेगवेगळ्या विषयांतले पदवीधर आहेत. त्यांतील १५ जणांची निवड अधिकारी पदासाठी झाली. विधी शाखेत पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तीन उमेदवार असून कला-वाणिज्य या पारंपरिक शाखांशिवाय इतर वेगवेगळ्या विद्या शाखांतील पदवीधरही या बँकेच्या सेवेत रुजू झाले. निवडलेल्या उमेदवारांत २५ मुलींचाही समावेश आहे. या बँकेच्या इतिहासात प्रथमच बहुविद्याशाखीय उमेदवार नोकरीमध्ये दाखल झाल्याचे सांगण्यात आले.
नांदेड बँकेपेक्षा सरस!
सुमारे दोन दशकांपूर्वी परभणी जिल्हा बँकेची अवस्था अतिशय बिकट झाली होती; पण आता १०४ शाखांच्या माध्यमातून ही बँक तोट्यातून बाहेर आली आहे. बँकेकडे २२०० कोटींच्या ठेवी जमा असून गेल्या मार्चअखेर या बँकेला साडेसात कोटींचा निव्वळ नफा झाला. अनिष्ट तफावत वगळता नांदेड बँकेच्या तुलनेत परभणी बँक अधिक सरस आहे. लेखा परिक्षणात या बँकेला ‘अ’ वर्ग मिळालेला आहे आणि आता शासकीय-निमशासकीय ठेवी स्वीकारण्याची परवानगी या बँकेला मिळालेली आहे.
