परभणी: परभणीचे पहिले महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीनंतर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षातले अनेक प्रमुख पदाधिकारी पक्षांतराच्या भूमिकेत आहेत. देशमुख यांनी रविवारी (दि.५) पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे.

पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीशीच एकनिष्ठ असलेले देशमुख यांची अजीत पवारांचे कट्टर समर्थक अशी राजकीय ओळख होती. परभणी महानगरपालिकेचे पहिले महापौरपद त्यांनी प्राप्त केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनात्मक जबाबदाऱ्या देत देशमुख यांच्या नेतृत्वाला वाव देण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी अजीत पवारांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. पक्षानेही त्यांच्याकडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर परभणी महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या. महापालिका निवडणुकीदरम्यान अनेक नवे कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाले.

महापालिका निवडणुकीतच राष्ट्रवादीत स्थानिक गटबाजीला प्रारंभ झाला होता. त्या परिस्थितीतही देशमुख यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न केला. अजीत पवार यांच्या निधनानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादीतल्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. विशेषतः गटबाजीबाबत तक्रारी कोणाच्या कानावर घालायच्या आणि पक्षांतर्गत भांडणे कोणत्या नेत्याकडे न्यायची यावरूनही राष्ट्रवादीत गेल्या काही महिन्यांपासून धुसफूस सुरू आहे.

राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेश विटेकर आणि प्रताप देशमुख यांच्यातही मधल्या काळात राजकीय मतभेद निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत आता थांबण्यात अर्थ नाही असा निर्णय देशमुख यांनी घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंगळवारी (दि.७) परभणी दौरा होता. या नियोजित जाहीर सभेत देशमुख यांच्यासह आणखीही काही प्रमुख स्थानिक नेत्यांचा पक्षप्रवेश ठरलेला होता. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिंदे यांचा दौरा रद्द झाल्याने देशमुख यांचा अधिकृत पक्षप्रवेश लांबणीवर पडला. ते राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती.

विशेष म्हणजे यापूर्वी देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. महापालिका निवडणुका होऊ द्या तोवर राजीनाम्याबाबत कोणताही निर्णय होणार नाही असे त्यांना पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. त्यानंतर देशमुख यांनी मनाने राष्ट्रवादी काँग्रेस केव्हाच सोडली होती. अखेर त्यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. अजीत पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या देशमुख यांच्या राजीनाम्याचे स्थानिक राजकारणावर पडसाद उमटतील असे मानले जात आहे.