परभणी : शिवसेनेत झालेल्या फाटाफुटीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आमदार व खासदार उद्धव ठाकरे यांच्या सोबतच एकनिष्ठ राहिल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राजकीय अवकाश जिल्ह्यात मिळत नव्हता, काल रविवारच्या (दि.३०) जाहीर सभेने शिंदे यांनी या जिल्ह्यात आपल्या पक्षाची पायाभरणी सुरू केली असून खासदार संजय जाधव यांच्या पक्षांतरानंतर शिंदे यांच्या शिवसेनेला आता जिल्ह्यात राजकीय आधार मिळाला आहे.

२०२२ साली शिवसेनेत आमदारांची मोठी फूट झाली. त्यावेळी परभणी जिल्हा या घडामोडीत कुठेच नव्हता. खासदार संजय जाधव व आमदार राहुल पाटील हे दोघे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. मात्र विरोधात राहून विकास होत नाही. संघर्ष कुठवर करणार ? सत्तेत गेल्याशिवाय कार्यकर्त्यांचेही समाधान होत नाही अशी भूमिका घेत खासदार जाधव यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर जिल्ह्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करायचे, अन्य पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सेनेत प्रवेश करायचा या दृष्टीने खासदार जाधव यांनी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार मोर्चेबांधणी चालवली होती. सेनेत अनेक जिल्ह्यांमध्ये सुरुंग लागल्यानंतर शिंदे यांच्याकडे येणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांची, लोकप्रतिनिधींची संख्या वाढत असली तरी परभणीत त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. खासदार जाधव यांच्या रूपाने शिंदे यांना जिल्ह्यात पकड असलेला नेता मिळाला.

यानिमित्ताने आता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी परभणी जिल्ह्यावर आपले लक्ष केंद्रित केले. ज्या शिवसेनेकडे आधी राजकीयदृष्ट्या पदरात काहीच नव्हते त्या पक्षाकडे आता संजय जाधव यांच्या रूपाने खासदार आणि सईद खान यांच्या रूपाने आमदार असे दोन लोकप्रतिनिधी मिळाले आहेत. स्टेडियम मैदानावर झालेल्या जाहीर सभेनंतर शिंदे यांनी शहरातील सर्व समाजातल्या घटकांशी संवाद साधला. यात व्यापारी, उद्योजक, वकील, अभियंते असे सर्व घटक होते. या कार्यक्रमात परभणी शहराला नवी औद्योगिक वसाहत देण्यात यावी, गंगाखेड शहरातील ‘मोसीकॉल’ची जागा ही अनेक वर्षांपासून पडून आहे. या २५ एकर जागेमध्ये औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात यावी अशा अनेक मागण्या उपमुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आल्या. विशेषतः उद्योग क्षेत्राशी संबंधित मागण्याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी थेट उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी मेळाव्यातूनच संपर्क साधला. सामंत यांनीही या सर्व मागण्या नजीकच्या काळात मान्य करण्यात येतील आणि औद्योगिक प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन दिले.

उद्धव ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदे यांनी प्रवेश केल्यानंतर या जिल्ह्यावर आपली पक्षाची पकड निर्माण व्हावी यासाठी शिंदे यांच्या वतीने भविष्यातही लक्ष दिले जाईल अशी चिन्हे आहेत. आतापर्यंत शिंदे यांच्या शिवसेनेला परभणी जिल्ह्यात राजकीय अवकाशच मिळत नव्हता, तो आता मिळाल्याने शक्तीप्रदर्शनाच्या माध्यमातून या पक्षाने आता आपली पायाभरणी केली आहे.