परभणी: परभणी-पाथरी महामार्गावरील राहुल जिनिंगसमोर शुक्रवारी (दि.२९) रात्री १० वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण आणि थरारक अपघात घडला. परभणीहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्सने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सर्वजण मानवत शहरातील रहिवासी असून, या घटनेमुळे संपूर्ण मानवत शहरावर शोककळा पसरली आहे.
परभणीहून पुण्याच्या दिशेने आरामदायी खाजगी बस (क्रमांक: NL 01 B 1374) जात होती. दरम्यान, राहुल जिनिंगसमोर समोरून येणाऱ्या दुचाकीला (क्रमांक: MH 22 BB 4724) ट्रॅव्हल्सने समोरासमोर जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की, दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
या भीषण अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे चारही तरुण जागीच ठार झाले. त्यात शुभम आप्पाराव दहे (वय ३० वर्ष), विष्णू गोरे (वय २८ वर्ष), प्रल्हाद अशोकराव कुटे (वय २९ वर्ष), नवनाथ शामराव जाधव (वय ३८ वर्ष) सर्वजण मानवत येथील राहणारे आहेत. अपघाताची भीषणता एवढी तीव्र होती की, मृतदेहांची अवस्था पाहून त्यातील एका जणाची ओळख पटवणे सुरुवातीला पोलिसांना आणि नागरिकांना अत्यंत कठीण झाले होते.
अपघाताची माहिती मिळताच मानवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, पोलीस उपनिरीक्षक किशन पतंगे, प्रमोद देवकते, शीतल बोर्डे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतांना आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.
या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहने बाजूला सारत वाहतूक पूर्ववत केली. या घटनेप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. एकाच वेळी मानवत येथील चार तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
