परभणी : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीतील गुंड प्रवृत्तीच्या आणि जीवित, मालमत्तेस धोका निर्माण करणाऱ्या तसेच इतरांच्या जीवित अथवा व्यक्तिगत सुरक्षिततेस धोका आणून कृत्य करणाऱ्या, जबरी चोरी करणाऱ्या, घातक हत्यारांशी दुखापत करणाऱ्या, गंभीर दुखापती करणाऱ्या, शस्त्रानिशी गैर कायद्याच्या मंडळीच्या समवेत दंगा, मारहाण, दुखापत आदी गंभीर स्वरूपाच्या गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या परभणी जिल्ह्यातील पाच इसमांना हद्दपार करण्यात आले आहे.
पूर्णा पोलीस ठाणे हद्दीतील टोळीप्रमुख अंकीत उर्फ बाळा संजय गायकवाड (वय २२) रा. पूर्णा ता. पूर्णा आणि त्याच्या टोळीतील आयुष राजेंद्र बरकुंटे (वय २० रा. कोळीवाडा ता. पूर्णा, श्रीनिवास रमेश गायकवाड (वय २२) रा. पूर्णा याच्या विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेकडून महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ५५ अन्वये पोलीस अधीक्षक कार्यालयास प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाची प्राथमिक चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी करून पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी प्रस्तावावर अंतिम चौकशी करून प्रस्तावित टोळीप्रमुख अंकित उर्फ बाळा संजय गायकवाड आणि टोळीसदस्य आयुष राजेंद्र बरकुंटे यांना एका वर्षासाठी तसेच टोळीसदस्य श्रीनिवास रमेश गाढवे रा. पूर्णा यास परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील वसमत तसेच नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश जारी केले आहेत.
नवा मोंढा पोलीस ठाणे हद्दीतील विवेक धनेश्वर साळवे (वय २३)रा. हडको कॉलनी परभणी याच्याविरुद्ध प्रभारी पोलीस स्टेशन आधिकारी नवामोंढा यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ५६ अन्वये दोन वर्षासाठी परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी परभणी यांच्याकडे पाठविला होता. तर कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील सोहेल खान नयून खान (वय२२)रा. अजिजिया कॉलनी परभणी याच्याविरुद्ध प्रभारी पोलीस अधिकारी कोतवाली यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ५६अन्वये दोन वर्षाकरीता परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठविला होता.
या प्रस्तावाची अंतिम चौकशी करून उपविभागीय दंडाधिकारी परभणी यांनी विवेक धनेश्वर साळवे (वय २३) रा. हाडको कॉलनी परभणी यास सहा महिन्यांसाठी तर सोहेल खान नयुम खान (वय २२)रा. अजिजिया कॉलनी परभणी यास एका वर्षासाठी परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जारी केले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
