परभणी: डिजिटल लँड रेकॉर्ड मॉडर्निझेशन प्रोग्रॅम अंतर्गत अधिकार अभिलेख संगणकीकरण प्रक्रियेला अधिक गती देण्यासाठी परभणी तालुक्यातील ९ मंडळ अधिकारी आणि ५२ ग्राम महसूल अधिकाऱ्यांना अत्याधुनिक लॅपटॉप व प्रिंटरचे वितरण करण्यात आले. उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या हस्ते हा वितरण सोहळा उत्साहात पार पडला.

महसूल विभागाच्या डिजिटल कामकाजासाठी आधुनिक साधनांची आवश्यकता लक्षात घेऊन तलाठी संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे गेल्या अनेक दिवसांपासून नवीन लॅपटॉप व प्रिंटरची मागणी करण्यात येत होती. शासनाने यापूर्वी सन २०१६ मध्ये लॅपटॉप व प्रिंटर उपलब्ध करून दिले होते. मात्र, बदलत्या तंत्रज्ञानामुळे ती यंत्रणा कालबाह्य झाली होती. सुधारित ऑनलाइन प्रणालीवर काम करताना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने शेतकरी व नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करणे कठीण बनले होते.

आता नव्याने मिळालेल्या संगणकीय सुविधांमुळे महसूल विभागाचे कामकाज अधिक वेगवान, पारदर्शक आणि कार्यक्षम होणार आहे. विशेषतः ई-फेरफार, ई-चावडी, ई-पीक पाहणी, सातबारा उतारे, फेरफार नोंदी, नवीन ई-पंचनामा प्रणाली तसेच नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप यांसारख्या महत्त्वाच्या सेवा अधिक सुलभपणे नागरिकांपर्यंत पोहचणार आहेत. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी महसूल विभागातील डिजिटल सेवांचा विस्तार ही काळाची गरज असून, नवीन यंत्रसामग्रीमुळे नागरिकांना अधिक जलद व दर्जेदार सेवा देता येतील, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमास तहसीलदार संदीप राजपुरे, नायब तहसीलदार राजकुमार राठोड, मंडळ अधिकारी नंदकिशोर सोनवणे, शिवाजी मोरे, प्रवीण खाडे तसेच ग्राम महसूल अधिकारी बालाजी बिडगर, सोपान गुट्टे, उर्मिला गायकवाड यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.