परभणी : मराठ्यांच्या लेकरांचे वाटोळे होत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीतला कार्यक्रम रद्द करावा अशी भूमिका अंतरवाली सराटीत उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी घेतली असून दुसरीकडे जरांगे पाटील यांच्या बद्दल आपल्याला आदर असून मेळावा मात्र रद्द होणार नाही अशी भूमिका खासदार संजय जाधव यांनी घेतली आहे. शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन करत येथे आयोजित केलेल्या मेळाव्यावर या वादाचे सावट निर्माण झाले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परभणीतल्या स्टेडियम मैदानावर आज रविवारी (दि.३०) शेतकरी व युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार संजय जाधव यांच्या पक्षप्रवेशानंतर हा शहरात होणारा मोठा कार्यक्रम असून या कार्यक्रमाच्या तयारीसाठी गेल्या आठवड्यापासून स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोर्चेबांधणी चाललेली होती. आज मेळाव्याला काही तास शिल्लक असताना नाट्यमय घडामोडी सुरू झाल्या. आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे अमरण उपोषण सुरू आहे. त्याच वेळी नेमका हा मेळावा असल्याने जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री संजय शिरसाठ व परभणीतल्या मेळाव्याचे आयोजक खासदार संजय जाधव यांच्यावर तोफ डागली.
मराठ्यांच्या लेकरांचे वाटोळे होत असताना खासदार जाधव यांनी परभणीतल्या मेळाव्याचा घाट घातला आहे. त्यांना हे महागात पडेल असे जरांगे यांनी स्पष्ट केल्यानंतर या मेळाव्यावर जरांगे पाटील यांच्या विरोधाचे सावट पसरले आहे. जरांगे यांच्या विधानानंतर खासदार जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मेळाव्याची तयारी चालू आहे. लोक आता सभेसाठी आपापल्या गावातून निघाले आहेत. मंडपात काही लोक दाखल झाले आहेत. अशावेळी मेळावा रद्द करणे योग्य होणार नाही. जरांगे पाटील यांच्या भूमिकेविषयी आपल्याला आदर आहे. त्यांना आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही सर्वजण त्यांच्या मागणीच्या सोबतच आहोत. आमची वेगळी भूमिका नाही मात्र कार्यक्रम रद्द करणे शक्य होणार नाही असे खासदार जाधव यांनी स्पष्ट केले.
दरम्यान येथील स्टेडियम मैदानावर टोलेजंग मंडप उभारण्यात आला असून या मेळाव्याला लगेचच सुरुवात होणार आहे. जरांगे पाटील यांनी जरी खासदार जाधव यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली असली तरी खासदार जाधव यांनी मेळावा रद्द होणार नसल्याचे सांगून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
खासदार जाधव यांनी सर्वात मोठी चूक केली आहे. ही जाधव यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. संजय शिरसाठ आणि एकनाथ शिंदे यांचे ऐकून हे सारे केले. मराठा समाजाने त्यांचे राजकीय आयुष्य उभे केले. पण ते विसरले आहेत. कार्यक्रम रद्द करण्याविषयी सांगितले होते. पण ते केले नाही. कार्यक्रम घेण्यापेक्षा मराठा समाजाला जोडून ठेवणे गरजेचे होते. पण तसे न केल्याने तुझ्या राजकारणाला अवकळा लागेल असे जरांगे म्हणाले आहेत.
