परभणी : ज्या मुस्लिम मतांची भीती दाखवत शिवसेनेने परभणीत आजवर ‘खान हवा की बाण’ असा प्रचार केला त्याच शिवसेनेने आता महापौरपदी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देऊन आपला राजकीय पवित्रा पूर्णपणे बदलला आहे. या मुद्द्यावरून सध्या भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वावर टीका चालवली असली तरी सेनेच्या नेत्यांनीही भाजपाला चोख प्रत्त्युत्तर दिले आहे.

भाजपनेही कशा तडजोडी केल्या याची काही उदाहरणे देत खासदार संजय जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. सय्यद इकबाल यांच्या रूपाने मुस्लिम समाजाला महापौरपदी प्रतिनिधित्व देऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने परभणीत आपली मुस्लिम मतपेढी आणखी बळकट केली आहे.

मुस्लिम महापौर दिल्यानंतर उबाठा शिवसेनेवर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी टीका केली. त्यावर आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. जेव्हा जेव्हा हिंदुत्व सिद्ध करण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा भाजपवाले कुठे असतात हे जनतेला माहित आहे अशी प्रतिक्रिया खासदार संजय जाधव यांनी दिली आहे.

मुस्लिम मतांच्या विरोधात हिंदू मतांचे ध्रुवीकरण करत सेनेने आजवर परभणी विधानसभेला विजय मिळवला. मागच्या सर्व निवडणुकीत ‘खान हवा की बाण’ यावर शिवसेनेच्या प्रचाराचा भर असायचा. त्यातून होणाऱ्या मतांच्या ध्रुवीकरणात शिवसेना बाजी मारायची. परभणी शहर हे निर्णायक अशा मुस्लीम मतांसाठी प्रसिद्ध आहे. आजवरच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सातत्याने मुस्लीम मतांचा विचार करून या मतदारसंघात बहुतांश वेळा मुस्लीम समाजाला उमेदवारी दिली.काँग्रेसकडून मुस्लीम उमेदवार रिंगणात असल्यावर शिवसेनेकडून धार्मिक रंग देत मतांचे ध्रुवीकरण कसे होईल याची खबरदारी घेतली जात असे. त्यातूनच ‘खान हवा की बाण’ अशा प्रचाराचा उदय झाला.

शहरातील मुस्लीम मतदारांची निर्णायक संख्या लक्षात घेता प्रस्थापित सर्वच राजकीय पक्ष महापालिका निवडणुकीत मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देतात. यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिले. मुस्लिम मते आपल्याकडे आकर्षित करणे हाच यामागचा उद्देश होता.

प्रत्येक विधानसभा निवडणुकीत ‘खान हवा की बाण’ असे म्हणत धार्मिक ध्रुवीकरण करून विजयाकडे झेपावणाऱ्या शिवसेनेच्या बाबतीत परभणी मतदार संघातले गणित गेल्या निवडणुकांपासून बदलले आहे. धार्मिक ध्रुवीकरण करायचे आणि राजकीय लाभ मिळवायचा अशी शिवसेनेची योजना असायची. त्यात सेना अनेकवार यशस्वी झाली मात्र गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर धनुष्यबाणाचे राजकीय संदर्भ पार बदलून गेले.

उलट मुस्लिम समाजाला विश्वास देऊन ही बहुसंख्य मते आपल्या बाजूने वळवण्याकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लक्ष केंद्रित केले.लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी भक्कम पाठिंबा दिल्यामुळेच परभणीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य राहिला. खासदार संजय जाधव व आमदार राहुल पाटील यांच्या विजयात मुस्लिम मतांचा वाटा निर्णय राहिला. परभणीच्या महापौरपदी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देऊन शिवसेनेने मुस्लिम मतांची योग्य ती परतफेड केली आहे.

असा आहे ‘खान बाण’चा इतिहास…

परभणी मतदारसंघात १९९० मध्ये सेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर हनुमंत बोबडे विजयी झाले. काँग्रेसने शमीम अहमद खान यांना उमेदवारी दिली होती, तर जनता दलाकडून विजय गव्हाणे रिंगणात होते. खान व गव्हाणे या दोघांनी राजकीय भाषेत ‘धर्मनिरपेक्ष’ मतांचे विभाजन केले. त्या वेळी बोबडे यांनी खान यांच्याविरुद्ध तब्बल १२ हजार मतांची आघाडी घेत विजय मिळवला. गव्हाणे व खान यांना मिळालेली मते ६५ हजार होती, तर बोबडे यांनी ४९ हजार मते मिळवली. या निवडणुकीपासून सेनेने हा प्रचार सुरू केला असे बोलले जाते.

१९९० पासून सेनेचा भगवा परभणी मतदारसंघात सातत्याने फडकत आहे. मुस्लीमबहुल असलेल्या या मतदारसंघात मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण झाल्यानंतर सेनेला विजय सोपा जात असे. सेनेचे उमेदवारही थेट तसा प्रचार करत. हळूहळू सेनेने या मतदारसंघावर आपला प्रभाव कायम ठेवला आणि ‘धनुष्यबाण’ हे सेनेचे चिन्ह हिंदुत्ववादी मतदारांच्या मनावर ठसले. धनुष्यबाण या चिन्हावरचा उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा अधिकार संपुष्टात आल्यानंतर परभणीत मोठे स्थित्यंतर घडले आहे.