परभणी: हाता-तोंडाशी आलेल्या सोयाबीनला पावसाचा जबर ताण सोसावा लागल्याने या पिकाची उत्पादकता प्रचंड घटली आहे. त्याचवेळी सोयाबीन काढणीतून काहीच निघणार नसल्याने जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांवर सोयाबीन या पिकावर रोटावेटर फिरवून ते भुईसपाट करण्याची पाळी आली आहे. दुसरीकडे सोयाबीनचे पीक बाजारात येण्याआधीच दर कमी झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वी क्विंटलला ७ हजार रुपयांपुढे गेलेले सोयाबीन आता चक्क हमीभावावर म्हणजेच क्विंटलला ५ हजार ७०० रुपयांवर येण्याच्या बेतात आहे.

यंदा सोयाबीन काढणीलाही परवडणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी हताशपणे आपल्या उभ्या पिकावर अनेक ठिकाणी रोटावेटर फिरवल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी सोयाबीन एकरी क्विंटलभरही निघणार नाही त्यामुळे सोयाबीन काढणी परवडणारच नाही म्हणून शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला. पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील शेतकरी सतीश अश्रुबा गिराम यांनी आपल्या ५ एकर उभ्या सोयाबीनच्या पिकावर रोटावेटर फिरवला. मात्र असा निर्णय घेणारे जिल्ह्यात एकटेच शेतकरी नाहीत. ज्या पिकावर पेरणीनंतर खत, मशागत असा सर्व खर्च केला, कुटुंबाची आर्थिक घडी नीट बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली ते पीक डोळ्यादेखत नष्ट होताना शेतकऱ्यांना पहावे लागत आहे.

मानवत तालुक्यातील रामपुरी (बु.) येथील शेतकरी बाळासाहेब सोरेकर यांनी आपल्या साडे नऊ एकर क्षेत्रातील उभ्या सोयाबीनच्या पिकावर दोन दिवसांपूर्वी रोटावेटर फिरवून हे पीक नष्ट केले. या वर्षी वेळेवर पेरणी करूनही पावसाने ऐन गरजेच्या वेळी दगा दिल्याने आणि विहिरी तसेच बोअरवेलचे पाणी आटल्याने सोयाबीनचे पीक वाळू लागले होते. पिकावर केलेला बियाणे, खते आणि मशागतीचा अफाट खर्च वाया गेल्याने हवालदील झालेल्या सोरेकर यांनी अखेर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटवेटर चालवत सोयाबीन जमीनदोस्त केले. गावोगाव याच पद्धतीने शेतकरी अत्यंत जड अंत:करणाने सोयाबीनवर रोटावेटर फिरवत आहेत.

सोयाबीन बाजारात येण्याच्या टप्प्यावर नेहमीच दर खाली येतात. यंदा सोयाबीनचे समाधानकारक उत्पादन कुठेही नाही. त्यामुळे बाजारात फारशी आवकही वाढणार नाही तरीही दर मात्र खाली आले आहेत. दोन महिन्यापूर्वी क्विंटलला ७ हजार रुपयांपेक्षा अधिक दर होता. आता मात्र तो चक्क हमीभावावर येऊन ठेपला आहे. मराठवाड्यात कापसापाठोपाठ सोयाबीन हे शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून गेल्या काही वर्षात ओळखले जाते. त्या पिकाला यंदा ‘अस्मानी’ सोबतच दर कोसळल्याने ‘सुलतानी’चाही फटका बसला आहे.