परभणी : खासदार संजय जाधव हे उबाठा शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर पक्षाने जाधव यांचे समर्थक असलेले जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांची उचलबांगडी करून विष्णू मुरकुटे यांची त्या ठिकाणी नियुक्ती केली. या प्रकारावरून खासदार जाधव यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्ष नेतृत्वाकडे पाठवण्याचे सत्र सुरू केले आहे. काही पदाधिकाऱ्यांनी मात्र राजीनामा देण्यास विरोध दर्शवला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून खासदार जाधव यांच्या पक्षांतरबाबत चर्चा सुरू आहे. अलीकडेच एका स्थानिक कार्यक्रमात जाधव यांनी सूचक वक्तव्य केले होते. ज्यांनी आपल्याला मोठे केले त्यांच्याशी प्रतारणा करणार नाही पण काळ बदलला आहे, आता मतदारही पैसे मागू लागले आहेत. विरोधी पक्षात किती दिवस राहायचे असे कार्यकर्ते बोलत आहेत. अजून पक्ष सोडला नाही. पुढचे आताच सांगता येणार नाही. असे म्हणत खासदार जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जाधव यांच्या संभाव्य पक्षांतराबाबत जी चर्चा सुरू आहे त्याचे खंडन अजूनही त्यांनी केले नाही. पक्ष नेतृत्वाने मुंबईत बोलावलेल्या परभणीच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधींच्या बैठकीला खासदार जाधव यांची अनुपस्थिती होती. ही बाब त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला बळकटी देणारी आहे.
एकीकडे खासदार जाधव हे पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे पक्ष नेतृत्वाने खासदारांचे समर्थक असलेल्या जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांच्या जागी विष्णू मुरकुटे यांची नियुक्ती केली आहे. या घटनेचे पडसाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उमटले आहेत. काल मंगळवारी (दि.५) दुपारनंतर खासदार जाधव यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वाकडे आपले राजीनामे पाठवायला प्रारंभ केला. हे सत्र अजूनही सुरूच आहे. विशेष म्हणजे अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याबाबत खुद्द खासदार जाधव यांचे फोन गेल्याचेही सांगितले जाते.
युवासेना जिल्हाप्रमुख दीपक बारहाते, महिला जिल्हा संघटक मंगल कथले, दलित आघाडी जिल्हा संघटक संजय सारणीकर, उपजिल्हाप्रमुख रणजीत गजमल, दशरथ भोसले, सभापती पंढरीनाथ घुले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे पक्षाकडे पाठवले आहेत. दरम्यान खासदार जाधव यांच्या समर्थकांच्या या राजीनाम्यामुळे पक्षातली स्थानिक पातळीवरची गटबाजी पुढे आली आहे. खासदार जाधव यांचे संभाव्य पक्षांतर लक्षात घेऊन पक्षाने आता स्थानिक नेतृत्वाची सूत्रे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्याकडे सोपवल्याचेही या निमित्ताने दिसून येत आहे.
