परभणी: परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड बैठक येत्या १८ मार्चला दुपारी दोन वाजता येथील जिल्हा परिषद सभागृहात पिठासीन अधिकारी शोभा जाधव यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी निर्देश जारी केले आहेत. दरम्यान सदस्य संख्येत सर्वात मोठा पक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भारतीय जनता पक्षाकडे जाणार असले तरी अध्यक्ष कोण होणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
वर्ष २०२२ ला परभणी जिल्हा परिषदेची मुदत संपली होती. त्यानंतर अनेक वर्ष प्रशासक नेमण्यात आले होते. राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेतल्या. त्यानुसार आता परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी शोभा जाधव यांची पिठासीन अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानुसार जाधव यांच्या अध्यक्षतेत महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम – १९६१, महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समिती (सभापती व उपसभापती पदांच्या आरक्षण व निवडणूक) नियम १९६२ मधील तरतुदीनुसार येत्या १८ मार्च रोजी दुपारी दोन वाजता निवड बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
परभणी जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर दावा केला आहे. मात्र परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण? हे निवड बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या एकूण ५४ जागांपैकी तब्बल २४ जागांवर विजय मिळवून भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १५ जागा मिळाल्या तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने पाच जागांवर विजय मिळवला. शिवसेना उबाठा पक्षाने ६ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस पक्षाला ३ जागा मिळाल्या असून एका जागेवर अपक्षाचा विजय झाला आहे. सर्वाधिक जागा जिंकल्याने भारतीय जनता पक्ष हाच सत्ता समीकरणातला प्रमुख पक्ष ठरला आहे. अर्थात सत्तासमीकरणात भारतीय जनता पक्ष उपाध्यक्षपद कोणाकडे देणार याबाबतही उत्सुकता आहे. विषय समित्यांच्या सभापती पदाबाबत मित्र पक्षांपैकी कोणाला संधी मिळते याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
१० मार्चला पंचायत समिती सभापती, उपसभापती निवड
जिल्ह्यातील सर्व नऊ पंचायत समित्यांची निवडणूक नुकतीच पार पडला. त्यानुसार जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून येत्या १० मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती निवडीची बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
