परभणी – जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडीत चारही सभापतीपदी महिलांनी बाजी मारली असून यानिमित्ताने जिल्हा परिषदेत महिला राज अवतरले आहे. विशेष म्हणजे अध्यक्षपद आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारीही महिलांकडेच असल्याने जिल्हा परिषदेत खऱ्या अर्थाने पदाधिकारी व प्रशासनाची सूत्रे आता महिलांच्या हाती आली आहेत.

परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी लता विजयकुमार वाकळे या आहेत तर मुख्य कार्यकारी अधिकारी नीतीशा माथुर या आहेत. जिल्हा परिषदेतील सत्तास्थानी व प्रशासनाच्याही सर्वोच्चपदी महिलाच असताना आज विषय समित्यांच्या सभापतीपदी ऐश्वर्या अजय चव्हाण, पार्वतीबाई प्रल्हादराव मुंडे, वैशाली पंकज जाधव, कौशल्याबाई तुकाराम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.

चार सभापतींपैकी दोन सभापती पदे भारतीय जनता पक्षाकडे तर राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेनेच्या शिंदे गटाला प्रत्येकी एक सभापतीपद मिळाले. अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडीनंतर शिंदे गटाने आपला विश्वासघात झाल्याची प्रतिक्रिया देत वेगळा सूर काढला होता पण आज सभापतीपदांच्या निवडीत या पक्षाने सत्तेत सहभाग घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापतीच्या निवडीची बैठक आज गुरुवारी (दि.२) पार पडली. उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले हे या बैठकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते.

बैठकीपूर्वी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत दोन तास नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला. यात महिला व बालकल्याण समिती आणि समाजकल्याण समिती सभापतीपदासाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशनपत्र दाखल झाले. त्यामुळे महिला व बालकल्याण सभापतीपदी पोखर्णी गटातून निवडून आलेल्या भाजपच्या ऐश्वर्या अजय चव्हाण यांची तर समाजकल्याण सभापतीपदी भाजपच्याच कोद्री गटातून निवडून आलेल्या पार्वतीबाई मुंडे यांची बिनविरोध निवड झाली.

दोन समित्यांसाठी एकापेक्षा अधिक नामनिर्देशनपत्र दाखल झाले. त्यामध्ये सदस्य माणिकराव हरकळ, सरूबाई जाधव, ऐश्वर्या चव्हाण, कौशल्याबाई शिंदे, सुचिता भरोसे आदी सदस्यांच्या नामनिर्देशनपत्रांचा समावेश होता. तर दुसऱ्या विषय विषय समिती सभापतीपदासाठी वैशाली जाधव, दिपालीताई चौधरी, संग्राम जामकर, कौशल्याबाई शिंदे, सविताबाई मुरकुटे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. मात्र प्रत्यक्ष निवड बैठक सुरू झाल्यानंतर नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या कालावधीत नामनिर्देशनपत्र मागे घेण्यात आले. त्यामुळे उर्वरित दोनही विषय समिती सभापतींचीही बिनविरोध निवड पार पडली.

ताडबोरगाव गटातून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या वैशालीताई पंकज जाधव आणि केकरजवळा गटातून निवडून आलेल्या शिवसेना शिंदे पक्षाच्या कौशल्याबाई तुकाराम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. या निमित्ताने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, चार सभापती पदे व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य काही महत्त्वाचीपदे ही महिला अधिकाऱ्यांकडे असल्याने जिल्हा परिषदेतील सत्ता व प्रशासनाची सूत्रे महिलांच्या हाती आहेत.

दरम्यान आज विषय समित्यांच्या सभापतींच्या निवड बैठकीनंतर पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर या जिल्हा परिषदेत दाखल झाल्या. भाजपसह राष्ट्रवादी व शिंदे गटाच्या सभापतींनी श्रीमती बोर्डीकर यांच्या उपस्थितीत आपला पदभार स्वीकारला. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष लता वाकळे, उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर उपस्थित होते.यावेळी महायुतीतल्या सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.