परभणी : जिल्हा परिषदेच्या एकूण ५४ जागांपैकी तब्बल २४ जागांवर विजय मिळवून भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १५ जागा मिळाल्या तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने पाच जागांवर विजय मिळवला. शिवसेना उबाठा पक्षाने ६ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस पक्षाला ३ जागा मिळाल्या असून एका जागेवर अपक्षाचा विजय झाला आहे. सर्वाधिक जागा जिंकल्याने भारतीय जनता पक्ष हाच सत्ता समीकरणातला प्रमुख पक्ष ठरला आहे.

परभणी महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर पक्षाने जिल्हा परिषदेसाठी मोर्चेबांधणी केली. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने प्रचार यंत्रणेत आघाडी घेतली होती. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याशीही भारतीय जनता पक्षाने समझोता केला. गुट्टे यांच्या विचारानुसार गंगाखेड मतदारसघातले उमेदवार भाजपने ठरवले. त्यांना कमळ हे निवडणूक चिन्ह दिले. या बेरजेचाही फायदा भाजपला झाला. विशेषतः जिंतूर आणि गंगाखेड या दोन विधानसभा मतदारसंघात भाजपचे बहुतांश जिल्हा परिषद सदस्य निवडून आले.

पाथरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच गटांपैकी चार गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर देवनांद्रा गटात शिवसेना शिंदे गटाच्या सुमनबाई चक्रधर उगले या विजयी झाल्या. सेलू तालुक्यातील पाचही ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी विजय संपादन केला आहे.झरी जिल्हा परिषद गटात भाजपचे दिलीप प्रभाकरराव देशमुख विजयी झाले असून टाकळी बोबडे गटात शिंदे सेनेच्या सुचिता आनंदराव भरोसे या विजयी झाल्या आहेत.

पिंगळी गटात शिंदे सेनेच्या पूजा अनिल सावंत, पेडगाव गटात काँग्रेसचे जितेंद्र गोपाल देशमुख यांनी विजय संपादन केला. टाकळी कुंभकर्ण गटात उद्धव सेनेच्या प्रतीक्षा प्रभुलाल जयस्वाल, विजयी झाल्या. दैठणा गटात काँग्रेसच्या ज्योत्स्ना गणेश घाडगे, यांनी यश मिळवले. पोखर्णी गटात भाजपच्या ऐश्वर्या अजय चव्हाण, लोहगाव गटात काँग्रेसचे अजित अनिलराव वरपुडकर, जांब गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे संग्राम प्रतापराव जामकर विजयी झाले. सिंगणापूर गटात उबाठा सेनेचे पांडुरंग बालासाहेब खिल्लारे यांनी बाजी मारली.