छत्रपती संभाजीनगर – राज्याच्या मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागलेले आमदार धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करत पालिकेवर सत्ता आणली असली तरी त्यांना बराच संघर्ष करावा लागल्याची चर्चा आहे. महायुतीच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी विजयी झाल्या असून, त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संध्या देशमुख यांचा ११ हजारांवर मताधिक्क्याने पराभव केला.

तर एकेकाळी भाजपचा गड असलेल्या परळीत एमआयएमच्या उमेदवार आयेशा मोहसीन शेख यांचा प्रभाग ३ मधून झालेला विजय हा सर्वात चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपचे आठ सदस्य निवडून आले आहेत.

परळी हा भाजपचे दिग्गज नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा गडच मानला जायचा. गोपीनाथ मुंडे यांच्या हयातीतच धनंजय मुंडे यांनी त्यांच्याशी झालेल्या वादातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अखंडित) प्रवेश केला होता. या काका-पुतण्यांमधील वादही नगराध्यक्ष पदावरूनच जाहीरपणे पुढे आला होता. त्यातही धनंजय मुंडे यांनी पुढे केलेले नाव हे दीपक देशमुख यांचे होते. देशमुख हे धनंजय मुंडे यांच्या पाठबळावर परळीचे नगराध्यक्ष झाले होते. १५ वर्षांनंतर धनंजय मुंडे यांचे कडवे समर्थक मानले जाणारे दीपक देशमुख यांनी निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला व त्यापक्षाकडून लढले. मात्र देशमुख स्वतः व त्यांच्या पत्नी संध्याही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्या. संध्या देशमुख यांना दहा हजारांच्या आसपास मते मिळाली.

परळीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व काँग्रेस स्वतंत्रपणे लढले. काँग्रेसने यावेळी वंचित बहुजन आघाडीशी युती केली होती. काँग्रेसच्या उमेदवार मैमुना बेगम सय्यद हनीफ यांनी सहा हजारांवर मते घेतली. पद्मश्री धर्माधिकारी यांना २२ हजार ६६६ मते मिळाली.

या निवडणुकीत भाजपला दहा जागा देऊ करून महायुतीचा धर्म पाळण्यात आल्याचा संदेश देण्यात आला. मागील निवडणुकीतील भाजपच्या विजयी उमेदवारांपेक्षा यावेळची संख्या अधिक आहे, हेच काय भाजपबाबत वैशिष्ट्ये म्हणता येईल. धनंजय मुंडे यांनी मात्र परळीवर राष्ट्रवादीचा वरचष्मा पुन्हा सिद्ध करण्यासाठीच सारी सूत्रे स्वतःकडे ठेवल्याचेही या निवडणुकीतूनही पुढे आले.

मुंडे यांच्या नेतृत्वाचे दुहेरी यश

धनंजय मुंडे यांनी परळीत एक हाती सत्ता आणली तसे त्यांनी गंगाखेडमधील निवडणुकीत लक्ष घातले होते. तेथे त्यांची बहीण ऊर्मिला मधुसुदन केंद्रे नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. ऊर्मिला केंद्रे यांनी आमदार रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाच्या महिला उमेदवाराचा पराभव केला.

परळीकरांचा महायुतीला कौल

परळीकरांनी महायुतीच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) उमेदवारांना भरभरून मतांनी निवडून दिले. या यशाने परळीकरांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवली. शिवाय परळीच्या बदनामीचा डावही उधळून लावला. – धनंजय मुंडे, आमदार

धर्माधिकारींकडे तिसऱ्यांदा सूत्रे

नवनिर्वाचित पद्मश्री धर्माधिकारी यांचे पती बाजीराव धर्माधिकारी हे २०१६ ते २०१८ या कालावधीत परळीचे नगराध्यक्ष होते. तर बाजीराव यांचे आजोबा माणिकराव धर्माधिकारी हे काँग्रेसची सत्ता असताना काही काळ प्रभारी नगराध्यक्ष राहिलेले आहेत.