छत्रपती संभाजीनगर – परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे लाच प्रकरणात अडकल्यानंतर त्यांना अटक करून पोलीस कोठडी मिळाली होती. या घटनेनंतर तहसीलदार मुंडे यांना तब्बल २३ दिवसांनंतर निलंबित करण्यात आले असून, या कालावधीतील त्यांचे मुख्यालय जालना जिल्हाधिकारी कार्यालय राहणार आहे. जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व संमतीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे व्यंकटेश मुंडे यांच्या विभागीय आयुक्तांनी काढलेल्या कारवाईच्या आदेशात म्हटले आहे.
परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे तक्रारदाराला ऐपतदार प्रमाणपत्र देण्यासाठी २० हजारांची लाच स्वीकारताना २० फेब्रुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात अडकले होते. मुंडे यांनी ऐपतदार प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीत २५ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने पुन्हा तडजोड करून २० देण्याचे ठरवून बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये मुंडे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. अंबाजोगाईच्या विशेष सत्र न्यायालयाने तहसीलदार मुंडे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली होती. त्यानंतर मुंडे यांची बीड जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
सरकारी अपचारी अधिकारी हे ४८ तासापेक्षा अधिक काळ न्यायालयीन कोठडीत (अभिरक्षेत) असल्याने त्यांना शासन सेवेतून निलंबित करणे आवश्यक असल्याच्या नियमान्वये तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना निलंबित करण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी १३ मार्च रोजी काढले. या संदर्भातील आदेशाची प्रत १७ मार्च रोजी माध्यमांपर्यंत पोहोचली.
मुंडेंच्या घरातून १३ तोळे जप्त
तहसीलदार मुंडे यांची पत्नी व मुले नांदेड येथील यशोविहार काॅलनीमध्ये किरायाने घेतलेल्या घरात राहतात. या त्यांच्या घराची लाचलुचपत प्रतिबंंधक विभागाच्या पथकाने झाडाझडती घेतली असता त्यात १३ तोळे सोने आणि ५५ हजार रुपये जप्त करण्यात आले होते. लाचप्रकरणातील कारवाई झाल्याच्या दुसऱ्या दिवशीचीच ही घटना आहे. मुंडे यांच्या परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातील शिरशी या मूळ गावच्या घरीही तपासणी करण्यात आली होती. परंतु तेथील घरात काही आढळले नाही. परंतु मुंडे यांचीच प्रत्यक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे ८० हजार रुपये आढळून आले होते.
कायम वादग्रस्त
तहसीलदार मुंडे हे परळीत कायम वादग्रस्त अधिकारी म्हणूनच राहिलेले आहेत. आपल्याला स्थानिक नेत्यांचा राजाश्रय आणि वरदहस्त असल्याचे मानून त्यांचे वागणे-बोलणे राहिलेले आहे. परळी वैद्यनाथ देवस्थान विश्वस्त मंडळाच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवरही तहसीलदार तथा मंदिर विश्वस्ताचे अध्यक्ष या नात्याने कधीही कारवाई केली नाही की त्यांना तेथून हुसकावून लावण्यात आले नाही, असा आरोप त्यांच्यावर काही पुजारी मंडळींनी यापूर्वी केलेला आहे. याशिवाय इतरही अनेक प्रकरणात मुंडे हे वादामुळेच चर्चेत आले होते.
