scorecardresearch

शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेश किमतीत २५ टक्क्यांपर्यंतची दरवाढ

करोनोत्तर काळात दरदिवशी वाढत असलेले इंधनाचे दर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तयार झालेली युद्धजन्य परिस्थिती पाहता जीवनावश्यकसह सर्वच क्षेत्रात दरवाढ अनिवार्य झालेली आहे.

औरंगाबाद : करोनोत्तर काळात दरदिवशी वाढत असलेले इंधनाचे दर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तयार झालेली युद्धजन्य परिस्थिती पाहता जीवनावश्यकसह सर्वच क्षेत्रात दरवाढ अनिवार्य झालेली आहे. शैक्षणिक क्षेत्रही त्याला अपवाद ठरणारे नाही. येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षांत शालेय स्तरावरील बालवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे दर ७ ते २५ टक्क्यांपर्यंत वाढलेले असणार आहेत.
औरंगाबादेत मंगळवारी इंग्रजी शाळांची शिक्षण परिषद आयोजित केली होती. या ठिकाणी काही गणवेश तयार करणाऱ्या संस्थांनी दालन उभे केले होते. येथे येऊन विविध संस्थाचालकांनी गणवेशांच्या किमतींचा अंदाज घेतला असता यंदाच्या किमतीत ७ ते २५ टक्के वाढ झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. गणवेश निर्मिती व्यवसायातील श्रेयस पोकर्णा यांनी सांगितले,की इंधन दरवाढ आणि रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर आयात-निर्यातीच्या क्षेत्रातील व्यवसायातून दिसून येत आहेत. गणवेश निर्मितीसाठी आवश्यक विशिष्ट कपडय़ांसह काही वस्तूंनाही आयात करावे लागते. बालवाडीपासून प्राथमिक स्तरावरील शालेय मुलांचा साधारण गणवेश २५० ते ३०० रुपयांना, तर उत्तम कापड, साहित्याचा वापर केलेला गणवेश ५०० रुपयांपर्यंत. माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचा साधारण ५०० ते ६००, तर उच्च प्रतीचा गणवेश ७०० रुपयांपर्यंत आहे. विशेष म्हणजे ३५-५० या दोन अंकीपासून ३ ते ४ अंकीत असलेल्या विद्यार्थी संख्येच्या शाळांच्या गणवेशासाठीही वरीलप्रमाणेच दर आहे. ब्लेझर गणवेशही ९०० ते बाराशेपर्यंत आहेत. काही शाळांच्या गणवेशामध्ये विशिष्ट प्रकारचे कापड, कलाकुसर, बटन, हुकसारखे साहित्य मागणीनुसार वापरावे लागते. असे काही साहित्य आयातही केले जाते. त्याच्या किमतीत आंतरराष्ट्रीय स्तरावरही वाढ झालेली आहे. साधारणपणे ७ ते २५ टक्क्यांपर्यंत गणवेशामध्ये दरवाढ झालेली आहे.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Percent increase price school uniforms essential for life amy