हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील पेठवडगाव येथील तरुणाच्या आत्महत्येनंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत पोलिसांनी वेगाने कारवाई करत नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाला अटक करण्यात आली. त्यास न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. मृतदेहाच्या अवहेलनाप्रकरणी तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळमनुरी तालुक्यातील पेठवडगाव येथील नवनाथ प्रकाश लाखाडे (वय २५) या तरुणाने गावाजवळील माळरानावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते.
या प्रकरणी नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिक अभिषेक उमाकांत सातपुते याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला उशिरा रात्री अटक केली. २० एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, मृतदेहाच्या शवविच्छेदनास तब्बल २२ तास विलंब झाल्याने प्रकरण अधिकच चिघळले. नातेवाईकांनी जवळपास १० तास ठाण्यात ठिय्या दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर, नातेवाईकांना भडकावून शवविच्छेदनास अडथळा निर्माण केल्याचा आरोप ठेवत पेठवडगाव येथील बालाजी देवकर, सोमनाथ रणखांब व निकेश गायकवाड यांच्याविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनैसर्गिक शरीर संबंध ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी मानसिक त्रास देत असल्याचे सांगत नवनाथ लाखाडे याने आत्महत्या केली होती. मृत आणि आरोपी दोघेही पोलीस दलात काम करत होते. या प्रकरणी आता पोलीस कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली आहे.
