छत्रपती संभाजीनगर – शहरातील जळगाव रोडवरील रिलायन्स जिओ पेट्रोल पंपातून पाण्याचे अंश मिश्रण असलेले पेट्रोल वितरित केल्याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात पंप मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अन्न धान्य वितरण अधिकारी भारती भास्करराव वाकोडे (वय ४५) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, १३ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे पत्रान्वये कळविण्यात आले की, फौजदारी रिट याचिकेमधील उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्राधान्याने प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करणे बाबत असे प्रत्र पाप्त झाला आहे. त्यानुसार अन्नधान्य वितरण अधिकारी विभागाच्या वतीने फिर्याद देण्यात येत आहे.

फिर्यादीनुसार सिडकोच्या एन ७ परिसरातून गेलेल्या जळगाव रोड वरील रिलायन्स जिओ पेट्रोल पंपावरून ग्राहकांना वितरित करण्यात येणाऱ्या पेट्रोलमध्ये पाणी मिसळले जात असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या प्रकरणी १६ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी तत्कालीन पुरवठा निरीक्षक विलास सोनवणे यांच्यामार्फत घटनास्थळी तपासणी करून पंचनामा करण्यात आला. त्यावेळी अंदाजे ४० ते ५० ग्राहक व वाहनधारकांनी पेट्रोलमध्ये पाण्याचे अंश आढळून येत असल्याबाबत तक्रारी केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार संबंधित पेट्रोल पंपाच्या तीन नोजलमधून नमुने घेऊन जप्त करण्यात आले. त्यानंतर १ डिसेंबर २०२१ रोजी नमुने रासायनिक विश्लेषणासाठी छावणीतील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

या नमुन्यांचा रासायनिक विश्लेषण अहवाल २६ डिसेंबर २०२२ रोजी प्राप्त झाला. त्यामध्ये नमुना क्रमांक १, २ व ३ हे पेट्रोलियम हायड्रोकार्बनचे नमुने असून, त्यामध्ये पाण्याचे अंश आढळून आल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित पेट्रोल पंप चालक मालक यांच्याविरुद्ध आवश्यक प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना २०२३ या सालात तीनवेळा तर २०२४ मध्येही एकवेळा पत्रांद्वारे कळविण्यात आले.

या परिस्थितीवरून पेट्रोलच्या गुणवत्तेबाबत गंभीर स्वरूपाची बाब निदर्शनास आली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. तपासामध्ये पेट्रोलमध्ये भेसळ झाल्याचे आढळुन आले व आवश्यक कायदेशीर तरतुदींनुसार संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी. त्यामुळे या प्रकरणी उपलब्ध पंचनामा, रासायनिक विश्लेषण अहवाल व संबंधित पत्रव्यवहार विचारात घेऊन, लागू कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा नोंदवून निष्पक्ष तपास करण्यात यावा, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी करून लागू कायदेशीर तरतुर्दीनुसार गुन्हा नोंदविण्याबाबत कार्यवाही करावी व प्रकरणाचा निष्पक्ष तपास करावा, असेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे सिडकोचे पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी सांगितले.