देशातील काही न्यायाधीश, पोलीस अधिकाऱ्यांविरोधात घातपात करण्याचा कट पीएफआयच्या कार्यकर्त्यांकडून आखण्यात येत असल्याची माहिती दहशतवाद प्रतिबंधक विभागाकडून मंगळवारी औरंगाबाद जिल्हा न्यायालयापुढे सादर करण्यात आली. मात्र, ज्यांच्याविरोधात कट आखण्यात येत होता ते न्यायाधीश व पोलीस अधिकारी नेमके कोण आहेत, याची माहिती मिळू शकली नाही. एटीएसकडून एक बंद लिफाफाही न्यायालयापुढे सादर करण्यात आला. पीएफआयच्या पकडलेल्या कार्यकर्त्यांकडून दहा मोबाइल फोन, एक हार्डडिस्क, लॅपटॉप यांचा डाटा औरंगाबाद येथील एका दुकनातून नष्ट करण्यात आला आहे. या दुकानाचा शोध सुरू आहे. संपुष्टात आलेली माहिती पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून बुधवारी यासंदर्भातील अधिक माहिती हाती येणार असल्याचेही एटीएसच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले.

या प्रकरणात यापूर्वीच शेख इरफान शेख सलीम ऊर्फ मौलाना इरफान मिल्ली (३७, रा. किराडपुरा), सय्यद फैजल सय्यद खलील (२८, रोजेबाग), परवेज खान मुजम्मील खान (२९, रा. जुना बायजीपुरा), जालन्याचा अब्दुल हादी अब्दुल रऊफ (३२, रा. रहेमान गंज) आणि शेख नासेर शेख साबेर (३७, रा. बायजीपुरा) यांना अटक करण्यात आलेली असून त्यांना दुसऱ्यांदा मिळालेल्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपुष्टात आली होती. या आरोपींची मंगळवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्या. एन एल. मोरे यांनी दिले. न्यायालयापुढे पीएफआयच्या खात्यावर तामिळनाडूतूनही मोठी रक्कम मिळाल्याची माहिती देण्यात आली. प्रकरणात एटीएसचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे आणि सहायक लोकाभियोक्ता विनोद कोटेच्या यांनी वरील सर्व मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.