छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित मंत्रिमंडळ बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगर सजविण्याची एका बाजूला घाई सुरू आहे, तर दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान पंधरा मोर्चे निघतील, असे सांगण्यात येत आहे. एका बाजूला मंत्रिमंडळाच्या बैठकीची घाई सुरू असतानाच आदित्य ठाकरे यांनी आज दुष्काळी भागाचा दौरा केला.
मंत्रिमंडळ बैठकीतून ४० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे ‘पॅकेज’ देण्याची तयारी सुरू असून, सचिव स्तरावर त्यांच्या मंजुरीसाठी लगबग सुरू झाली आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सुरू असणारे उपोषण सुटल्यामुळे तरतुदीतून मतपेढीचे गणित जुळविण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होईल, अशी टीका आता सुरू झाली आहे. मुक्तिसंग्रामानिमित्त शुक्रवारी शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. सकाळी पावसानेही हजेरी लावली. सायंकाळपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्र्यांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार हे मुक्तिसंग्रामाचे कार्यक्रम आणि मंत्रिमंडळाची बैठक याचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह २९ मंत्री, त्यांचे सचिव, स्वीय सहायक, मंत्रालयातील विविध विभागांचे प्रधान सचिव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी छत्रपती संभाजीनगर येथे आले आहेत.




मंत्रिमंडळ बैठकीवर दुष्काळाचे सावट कायम आहे. मराठवाडय़ातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा अजूनही पुरेसा झालेला नाही. पाणीटंचाईचे मोठे संकट आ वासून उभे आहे. या पार्श्वभूमीवर तरतुदीतील महत्त्वाचा वाटा सिंचन आणि पाणीपुरवठा योजनांवर होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. निजामकालीन शाळा, अंगणवाडय़ा आणि ग्रामपंचायतींच्या अशा हजारहून अधिक इमारतींसाठी निधी मागण्यात आला आहे. अर्धवट सिंचन प्रकल्प आणि नदीजोड प्रकल्पासाठीही मोठय़ा तरतुदीची मागणी प्रस्ताव म्हणून पुढे ठेवण्यात आली असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठय़ासह मराठवाडय़ाला कोकणचे पाणी, म्हैसमाळ प्राधिकरणाला दिलेल्या ४५३ कोटींचा उडालेला बोजवारा यांसह विविध निर्णयांची अंमलबजावणी न झाल्याची आठवण करून देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘घे पॅकेज’ नावाने आंदोलन केले.
आंदोलनांची संख्या वाढली
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील क्रांती चौकात ओबीसी समाजाचे नेतेही आमरण उपोषणास बसले आहेत. विभागीय आयुक्तालयासमोर स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांनीही आंदोलन सुरू केले असून, शहरातील विविध ठिकाणी आता आंदोलक एकवटू लागले आहेत. लेबर कॉलनी भागात प्रशासकीय इमारत होऊ नये म्हणून आंदोलक एकत्र झाले आहेत.
मागण्यांचा पाठपुरावा
उदगीर भागातील नागरिकांनी दूध भुकटी प्रकल्पास नव्याने मान्यता देण्याची विनंती केली आहे, तर उस्मानाबादी शेळी, लाल कंधारी गाय, देवणी बैल या प्रजाती टिकवून धरण्यासाठी संशोधन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, लातूर भागात सोयाबीन संशोधन केंद्राचीही मागणी होत आहे.
नेत्यांच्या मुलांची फलकबाजी
शहरातील विविध चौकांत ‘रोषणाई’ असतानाच पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी त्यांच्या मुलाचेही फलक शहरभर लावले आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आमदार प्रदीप जैस्वाल यांनीही त्यांच्या मुलाला पुढे केले आहे. शहरातील इतर फलक मात्र महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज आवर्जून काढून घेतले. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी आपल्या मुलाचा चेहरा जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न दोन नेत्यांनी केला.