औरंगाबाद : ध्वनिवर्धकासाठी ठरवून दिलेल्या आवाजाची मर्यादा पाळणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे ध्वनिवर्धक लावण्याची परवानगी नसेल ती त्यांनी घ्यावी अन्यथा कारवाई करावी लागेल. पण त्यापूर्वी परवानगीसाठी अवधी दिला जाईल असे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेच्या परवागीबाबतचा अर्ज अद्याप पोहोचला नसून त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या जागेत सभा घ्यायची की अन्यत्र कोठे परवानगी द्यावयाची याची चर्चा पोलीस दलात सुरू झाली असली, तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये सभा ठरलेल्या जागीच घेतली जाईल, असे मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी सांगितले. दरम्यान, या सभेच्या तयारीसाठी मनसेचे दिलीप धोत्रे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पाहणी केली. आता वॉर्डावॉर्डात कार्यकर्ते सभेसाठी निमंत्रण देण्यासाठी जात असल्याचा दावाही मनसेकडून करण्यात आला.

महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभा घेण्याचे जाहीर केल्यापासून विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीने या सभेस परवानगी नाकारा, अशी लेखी विनंतीच पोलीस आयुक्तांना केली आहे. या सभेमुळे औरंगाबाद शहरातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडेल, असेही आयुक्तांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे सभेच्या परवानगीवरून बराच गदारोळ सुरू आहे. मनसेकडून आता सभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, हिंदु जननायक राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारेही पत्रही पोलीस आयुक्तांना पाठविले जात आहे. गणेश उगले पाटील, समाधान तायडे, अजिंक्य ढोबळे आदींच्या या पत्रावर सह्या आहेत. पोलिसांनी ध्वनिवर्धकाची मर्यादा पाळा अशा सूचना दिल्या आहेत. तसेच त्यासाठी परवानगी घेतली नसेल, तर ती घ्यावी असेही म्हटले आहे.