छत्रपती संभाजीनगर : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात एक पोलीस शिपायाने पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरे लग्न जमवले. ते होत असताना पहिली पत्नी आली आणि तिला उतावळ्या नवऱ्याने मारहाण केली. पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला. आता वरिष्ठ अधिकारी या प्रकाराची चौकशी करत आहेत.
नवरदेव पोलीस एक महिलेस मारहाण करत असल्याचे चलचित्र समाजमाध्यमांवर आले आणि तो व्यक्ती पोलीस असल्याचे समजल्यावर त्यांच्या विरोधात रोष व्यक्त होऊ लागला. पोलीस शिपाई प्रशांत गंगाधर गजबरे याने २०२२ मध्ये शारदा गजबरे (वय ३१) हिच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यांना दोन वर्षांची मुलगी आहे. पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद असले तरी त्यांनी कायदेशीर घटस्फोट घेतलेला नव्हता. शारदा हिने तक्रारीत म्हटले आहे की, ५ जुलै रोजी समाज माध्यमातील छायाचित्रांवरून तिला पती दुसरे लग्न करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ती नातेवाईकांसह वसमत शहरातील कृष्णा मंगल कार्यालयात सायंकाळी सुमारे ४ वाजता पोहोचली. तेथे सुरू असलेल्या विवाहसोहळ्यात तिने पतीला दुसऱ्या विवाहाबाबत जाब विचारला.
एफआयआरनुसार, प्रशांत गजबरे व त्याच्या नातेवाईकांनी शारदा आणि तिच्यासोबत आलेल्या नातेवाईकांना शिवीगाळ केली तसेच मारहाण केली. शारदाने असा आरोपही केला आहे की, नवरदेवाच्या वेषातील पतीने तिचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत तिच्या हाताला दुखापत झाली.लग्नासाठी उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी आणि पाहुण्यांनी या घटनेचे चित्रीकरण केले. यात शेकडो पाहुण्यांसमोर वराने एका महिलेवर मारहाण केल्याचे दिसत आहे. मात्र, उपस्थितांपैकी कोणीही ही मारहाण थांबविण्याचा प्रयत्न केला नाही.
घटनेनंतर शारदा हिने ५ जुलैच्या रात्री वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वसमत शहरचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी सांगितले की, फिर्यादी पोलीस ठाण्यात आल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशांत गजबरे, त्याचा भाऊ, वहिनी आणि अन्य नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.स्वतःला आणि आपल्या दोन वर्षांच्या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी करत शारदा म्हणाली, “मला न्याय हवा आहे आणि माझ्या दोन वर्षांच्या मुलीला तिचे वडील मिळावेत, एवढीच माझी इच्छा आहे, अशी फिर्याद पहिल्या पत्नीने पोलिसांकडे केली आहे.
