विकल्प बदलल्याने अनेक उमेदवार परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता

औरंगाबाद : राज्यात पोलीस भरतीसाठी होणाऱ्या लेखी परीक्षेपूर्वी ‘आरक्षणा’ तील विकल्पाच्या घोळामुळे अनेक उमेदवारांना प्रवेशपत्रापासून (हॉलतिकीट) वंचित रहावे लागत असल्याने उमेदवार वैतागले आहेत.

७२० पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढताना मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाचे आरक्षण लागू होते. पुढे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्याने या उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातून किंवा आर्थिक विशेष मागास प्रवर्गातून अर्ज करण्याचा विकल्प देण्यात आला होता. तेव्हा बहुतांश उमेदवारांनी आर्थिक मागास प्रवर्गातून अर्ज भरले. पण अनेक जिल्ह्यात या प्रवर्गातील रिक्त जागाच नसल्याने उमेदवारांना हॉलतिकीट देता येणार नसल्याची भूमिका पोलीस प्रशासनाने घेतली. त्यामुळे उमेदवार हैराण असून मंगळवारी अनेक उमेदवारांनी पोलीस आयुक्तालय गाठले. पण आता काही करता येणार नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सांगून परत पाठविले.

औरंगाबाद पोलीस आयुक्तालयात १५ रिक्त पदांसाठी परीक्षा होणार आहेत. या पदांसाठी अनेकांनी मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर आर्थिक विशेष मागास प्रवर्गातून अर्ज भरले. पण या प्रवर्गाच्या रिक्त जागाच औरंगाबाद जिल्ह्यात मंजूर नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देता येणार नाही, अशी भूमिका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली.

गेल्या दोन दिवसांपासून अनेक उमेदवार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर ही बाब घालत असून परीक्षा देण्यासाठी काही तरी मार्ग काढा, अशी विनंती करत आहेत. कोणत्याही प्रवर्गातून का असेना परीक्षा तरी देऊ द्या, अशी विनंती उमेदवार करीत आहेत.

पोलीस आयुक्तालयासमोर भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेतील अडचणी सांगताना उमेदवार पूजा समासे म्हणाल्या, ‘ आरक्षणासाठी विकल्प देताना आमचे अर्ज स्वीकारलेच का गेले, आता दोन वर्षे केलेला अभ्यास आणि शारीरिक कसरत वाया जाईल.’ केवळ एका जिल्ह्यात ही समस्या नाही तर अनेक जिल्ह्यांतील उमेदवार परीक्षेला बसू शकणार नाहीत. सोलापूरमध्येही अशीच समस्या असल्याचे सांगण्यात आले. नांदेडहून परीक्षेसाठी तयारी करणारे उमेदवार किशोर घाटे म्हणाल्या,‘‘२०२० मध्ये मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द केल्यानंतर विकल्प देण्यात आला. पण तेव्हा खुला प्रवर्ग आणि आर्थिक मागास प्रवर्ग असे दोन पर्याय होते. बहुतेकांनी दुसरा पर्याय निवडला. पण त्या प्रवर्गातील जागाच अनेक जिल्ह्यात नसल्याने अनेक उमेदवारांना आता प्रवेशपत्रही मिळणार नाही. ही समस्या राज्यभर असल्याचे पोलीस अधिकारी सांगतात.

‘‘अनेक उमेदवार सध्या आरक्षण विकल्पामुळे निर्माण झालेली अडचण सांगण्यासाठी पोलीस मुख्यालयात येत आहेत. आर्थिक मागास प्रवर्गातील जागाच नसल्याने या उमेदवारांना प्रवेशपत्र देता येणार नाहीत. ज्यांनी हा विकल्प निवडला त्यांनी त्या प्रवर्गात जागा आहेत की नाही याची खातरजमा करणे आवश्यक होते. पण तसे न करता विकल्प भरले गेल्याने आता हॉलतिकीट देता येणे अवघड आहे. ही समस्या केवळ औरंगाबादपुरती नाही. सोलापूर जिल्ह्यातूनही अशाच तक्रारी आल्या असल्याचे कानावर आले आहे. अनेक जणांना ही अडचण असल्याचे मात्र दिसून येत आहे. कारण अडचण सांगणाऱ्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. –अपर्णा गीते, पोलीस उपायुक्त औरंगाबाद