छत्रपती संभाजीनगर : मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या २३ वर्षीय तरुणीवर एका ५८ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाने अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात संबंधित अधिकारी त्याची पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळ नांदेडची आणि पुण्यात नोकरी करणाऱ्या एका तरुणीचा भ्रमणध्वनी हरवला. त्याची तक्रार देण्यास ती क्रांती चौक पोलीस ठाण्यात गेली. तिथे तिची भेट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्याशी झाली. या अधिकाऱ्याने मदत करू असे सांगत तिचा विश्वास संपादन केला आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
लग्नाचे खोटे आमिष दाखवून त्यांनी शहरात विविध ठिकाणी तरुणीवर अत्याचार केले, इतकेच नाही तर बनावट मंगळसूत्र बांधून ती आपली पत्नी असल्याचे भासवले. या काळात पीडितेची इच्छा नसताना तिचे तीनवेळा गर्भपात करावा लागला असा जबाब पीडित मुलीने केला आहे.
या तरुणीने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा आरोपीने तिला जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणाची माहिती मिळताच आरोपीची पत्नीआणि मुलगा यांनीही पीडितेला मारहाण करून धमकावले असल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
