‘तुम्ही जनावरे द्या, आम्ही सांभाळू’ असा धोशा बीडमधील पुढाऱ्यांनी पशुपालकांकडे लावणे सुरू केले आहे. त्यामुळे भाकड जनावरे शेतकऱ्यांनीही छावणीत सोडली. परिणामी १३४ छावण्यांमध्ये १ लाख ९०६ जनावरे दाखल झाली आहेत. प्रत्येक छावणीवर पक्षाचा झेंडा फडफडतो आहे. विशेष म्हणजे छावणीच्या उद्घाटनाच्या वेळी अगदी फटाक्यांची आतषबाजी केली जात आहे. बीड जिल्ह्य़ातील छावणी उत्सवाचे राजकारण तेजीत आहे. यातही भाजप आघाडीवर आहे.
काही छावण्यांची उद्घाटने अजून बाकी आहेत. छावण्यांच्या उद्घाटनाला फटाकेही फोडले जात आहेत. यावरून हा ‘उत्साह’ दुष्काळ आवडे सर्वाना या श्रेणीतला असल्याचे सांगितले जाते. मोठय़ा जनावराला प्रतिदिन ६३ रुपयांचा चारा देणे अपेक्षित आहे, तर छोटय़ा जनावरांना ३० रुपयांचा चारा द्यावा, असे आदेश आहेत. जिल्ह्य़ातील छावण्यांमध्ये आणखी एक आश्चर्य पाहावयास मिळते. मोठय़ा जनावरांच्या तुलनेत छोटय़ा जनावरांची संख्या खूपच कमी आहे. एक लाखपैकी केवळ १० हजार ५६४ छोटी जनावरे आहेत. मोठय़ा जनावरांची अधिक नोंदणी झाली तर अधिक पैसा असे थेट गणित लावले जात आहे. जिल्ह्य़ात १५२ छावण्या मंजूर करण्यात आल्या आहेत.
भाजप जिल्हाध्यक्ष संचालक असलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या चार छावण्या आहेत. भाजप आमदार भीमराव धांडे यांनीही ६ छावण्या आपल्या संस्थेमार्फत सुरू केल्या आहेत. भाजपच्याच शांतिलाल डोरले यांच्या ३ छावण्या आहेत. आमदार विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी ७ छावण्या सुरू केल्या आहेत. भाजपच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या या छावण्यांच्या बरोबरीला भाजप आणि शिवसेनेचे नेतेही आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात असणाऱ्या बाजार समित्या व दूध संघामार्फत ३ छावण्या सुरू आहेत. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कुंडलिकराव खाडे यांनी ३ छावण्या सुरू केल्या आहेत. ९० हजारांहून अधिक जनावरे छावण्यांमध्ये आल्यानंतर प्रशासनाने त्याची तपासणी सुरू केली. तेव्हा प्रत्येक छावणीवर पक्षाचा झेंडा दिसू लागला. किमान छावण्यांच्या बांबूवर लावलेले झेंडे तरी काढून घ्या, असे लेखी आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी बजावल्यानंतर काही ठिकाणी आता झेंडे काढण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. काही ठिकाणी तर अजूनही झेंडे फडकत आहेत.