नांदेड : सध्या महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रांचा आणि विशेषतः राजकारणाचा झपाट्याने ऱ्हास होताना आपल्याला दिसत आहे. तो रोखायचा असेल तर महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांच्या- मग ते कोणत्याही जातीचे किंवा धर्माचे असतील- त्यांच्या हितसंबंधांना सामावून घेणारा आणि त्यांचा एकत्रित विचार करणारा महाराष्ट्र धर्म आकाराला आला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ.दीपक पवार यांनी येथे केले.

राज्याची राजकीय संस्कृती ही आता रसातळाला पोहोचलेली असून सर्वच राजकीय शक्ती या सत्ताकांक्षी झाल्या आहेत अशी खरमरीत टीका त्यांनी यावेळी केली. एकीकडे सत्ताधारी हे विरोधकांना संपवू पाहत आहेत तर दुसरीकडे विरोधकांपैकीच अनेकांना सत्तेत सामील होण्याची घाई झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

डॉ.पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा सविस्तर आढावा घेतला. राज्याच्या निर्मितीनंतरच्या पहिल्या दोन दशकात बेरजेचे राजकारण जे आकाराला आले ते प्रत्यक्षात विरोधकांना संपवायचेच राजकारण होते असे त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले. भूतकाळात रमत वर्तमानातील प्रश्नांपासून पळ काढण्याच्या मराठी माणसांच्या वृत्तीबाबत त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभय दातार यांनी केले. नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्रा. श्यामल पत्की यांनी डॉ. पवार यांचे स्वागत केले तर डॉ. श्रीनिवास पांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नांदेड शहरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.