नांदेड : विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने नांदेडमध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी २०१० सालच्या निवडणुकीतील प्रयोगाची पुनरावृत्ती केली. अमरनाथ राजूरकर यांच्या विरोधात लढण्याची तयारी करून तेव्हा त्यांनी शेवटी माघार घेतली होती, तर आता राजूरकरांच्या विरोधात अपक्ष अर्ज भरणारे त्यांचे पुत्र प्रवीण पाटील यांनीही माघार घेतली आहे.
राजूरकर तेव्हा काँग्रेसचे उमेदवार होते, तर आता ते महायुतीतील भाजपाचे तसेच खा.अशोक चव्हाण यांचे उमेदवार असून वरील निवडणूक जाहीर होताच ‘राष्ट्रवादी’तर्फे आ.चिखलीकर यांनी मागील पंधरवड्यात उचल खाल्ली होती. भाजपाच्या विरोधात सर्व विरोधकांतर्फे एकच उमेदवार उभा करण्याच्या मोहिमेत त्यांनी पुढाकार घेतला होता.
या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यापूर्वी चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करत महायुतीतील भाजपाला आव्हान देण्याचे चित्र उभे केले. त्यानंतर अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी आ.चिखलीकर येथून मुंबईला गेले. तेथील वास्तव्यात त्यांनी ‘राष्ट्रवादी’च्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनाही ते भेटले. त्यानंतर भाजपाविरोधात एकच सक्षम उमेदवार देण्याचा त्यांचा इरादा मुंबईतील वास्तव्यात गळून पडला.
स्थानिक पातळीवर भाजपा नेते आणि चिखलीकर यांचा अबोला ठळकपणे दिसला होता. राजूरकर यांचा अर्ज भरण्याप्रसंगी या, असे त्यांना भाजपाकडून कोणीही कळविले नव्हते. पण मुंबईतील अज्ञात घडामोडींनंतर चिखलीकर आणि खा.चव्हाण यांची गुरुवारी सकाळी संयुक्त पत्रकार परिषद होणार, असा संदेश बुधवारी सायंकाळी चिखलीकरांच्या स्थानिक कार्यालयातून जारी होताच जाणत्यांना ‘मिले सूर मेरे-तुम्हारे’चा अंदाज आला. त्यानुसार गुरुवारी चिखलीकर यांनी आपले पुत्र माघार घेत आहेत, असे येथे जाहीर केले.
२०१० साली या मतदारसंघावर काँग्रेसचा प्रभाव होता. चिखलीकर तेव्हा आमदार नव्हते. कारण २००९च्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी त्यांचा पराभव घडवून आणला. पण तेव्हा काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांच्याशी चिखलीकरांची जवळीक होती. माघारीची मुदत संपण्यापूर्वी स्थानिक पातळीवरील वाटाघाटी आणि नंतर विलासरावांकडून आलेल्या सूचनेनुसार चिखलीकर यांनी आपला अर्ज मागे घेत राजूरकर यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा केला.
२०१६ साली चिखलीकर यांनी आपले मेहुणे श्यामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून राजूरकर यांना तगडे आव्हान दिले. तसेच भाजपाचा पाठिंबा मिळवला. काँग्रेसची काही मते फोडली; पण निवडणुकीत त्यांना यश आले नाही. यावेळी त्यांनी आधी आव्हानाचे तुफान निर्माण केले. भाजपाच्या विरोधातील काही प्रमुख नेत्यांशी संपर्क साधला, एकच प्रबळ उमेदवार देण्याची नेपथ्यरचना उभी केली; पण शेवटच्या क्षणी त्यांनी ‘तो मी नव्हेच’चा पवित्रा घेत युतीधर्म पाळण्याचे जाहीर केले.
