छत्रपती संभाजीनगर – खासगी शाळांकडून एक संच पालकांना घ्यावाच लागतो आहे. त्याची किंमत दहा हजार रुपये. त्यात काही पुस्तकं-वह्या, रंगाची पेटी, बॅग वगैरे साहित्य अन इतर वस्तु फार काळ न टिकणाऱ्या किरकोळ स्वरुपाच्या. याशिवायही अन्य काही वस्तु, गणवेश, पायमोजे-बूट, शालेय बसचे वार्षिक १२ हजारांचे भाडे आणि शुल्क, असा खर्च पाहता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) शाळेत शिकत असलेल्या एका पाल्याचा शैक्षणिक खर्च एक ते सव्वा लाखांवर जात आहे.

त्यावर पुन्हा शाळेने त्यांच्या स्तरावर काही वस्तुंची जंत्री तयार केलेली असून त्याची सक्ती होत असल्याने पालक मंडळींचा जीव सध्या मेटाकुटीला आलेला असून, व्यवस्थेविरुद्धचा संताप मोबाईलवरील गटागटांमधून व्यक्त होऊ लागला आहे. एकल पालक असलेल्या वंदनाताई (नाव बदललेले) सांगत होत्या त्यांची मुलगी शहरातील एका नामांकित शाळेतील तिसरीच्या वर्गात गेली आहे. पण तिच्या शालेय खर्चाची गोळाबेरीज केली असता ती दीड लाखांच्या आसपास जाणारी आहे. मुलीच्या एका पुस्तकाची किंमत ९०० रुपयांपर्यंत.

त्यात शाळेचा आग्रह वह्या आम्ही ठरवलेल्या प्रकाशन संस्थेकडून घ्यायच्या. ही प्रकाशन संस्थाही शाळेचीच असण्याची शक्यता अधिक. शाळा आम्हाला एक वही ५० रुपयांना विकते. पण त्या वहीची किंमत गुलमंडीवर ११ रुपयांना आहे. शाळा ३९ चाळीस रुपये नफा कमावते असल्याचे प्रथम दर्शनी दिसते. तिसरीचे स्टोरी बुक ऑनलाईन मागवले तर २०० रुपयांना. शाळेकडून तेच बुक ४५० रुपयांना सक्तीने घ्यावे लागत आहे. पुस्तके-वह्यांच्या संचासाठी मी ८ हजार ६५५ रुपये मोजले.

वंदनाताईं बऱ्याच वस्तुंच्या किमतीवर प्रकाश टाकत होत्या. मुलीचा गणवेष व इतर साहित्यावर होणाऱ्या खर्चाविषयी त्यांनी सांगितले की, गणवेषावर वार्षिक पाच हजारांवर खर्च जातो. त्यात एक स्कर्ट ५६० तर शर्ट ४०० रुपयांना. विशिष्ट दिवसांमधील गणवेषांसाठी १ हजार २००, तर थंडीतील हुडी (जॅकेट) शाळेकडूनच ८५० रुपयांना खरेदी करावे लागते. बूट-साॅक्ससाठी दीड हजार रुपये. दरवर्षी शाळेकडून नवीन पुस्तके खरेदीची सक्ती केली जाते. शालेय बससाठी तीन किलाेमीटरच्या आतील परिघात राहणाऱ्यांसाठी वार्षिक १२ हजार रुपये असून, याशिवाय शुल्क (फी) ८९ हजार ९१ रुपये.

शहर व जिल्ह्यातील शाळांची संख्या

जिल्ह्यामध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) सुमारे ५२ शाळा आहेत. त्यात दहावीचे साडे चार हजारांवर तर बारावीची विद्यार्थी संख्या २ हजारांवर आहे. खासगी इतर शाळांची संख्या शहरामध्ये ९३६ पर्यंत, तर जिल्ह्यात एकूण ४ हजार ५०० वर शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या २ हजार ८२ तर महापालिकेच्या ५२ शाळा आहेत. मनपानेही काही वर्षांपासून सीबीएससीच्या शाळा सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थी संख्या आठ लाखांवर आहे.

सरकारनेच कुठल्याही शाळेला पालकांवर पुस्तके-वह्यांची सक्ती करू नये, असे पत्रक काढून आवाहन केले आहे. ते पत्र शाळांनाही पाठवण्यात आले आहे. त्यानंतरही कुठे सक्ती होत असेल तर पालकांनी तक्रार केली तर त्याची दखल घेऊ. डाॅ. कैलास दातखीळ, उपसंचालक, शिक्षण.