छत्रपती संभाजीनगर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी नियुक्त केलेल्या राज्य कार्यकारिणीला तरुण चेहरा दिलेला असला तरी त्यामध्ये मागील दोन कालावधीत उपाध्यक्षपदावर असलेल्या माजी खासदार आणि पक्षाचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या डाॅ. प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याबद्दल मुंडे समर्थकांमध्ये नवी चर्चा सुरू झाली आहे. डाॅ. प्रीतम मुंडे या दोन वेळा खासदार राहिलेल्या असून, तिसऱ्यावेळी त्यांच्याऐवजी ज्येष्ठ भगिनी पंकजा मुंडे यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती.

या निवडणुकीला आता दोन वर्षे होत आली असून, डाॅ. प्रीतम मुंडे यांचे अद्यापही पक्षीयस्तरावर पुनर्वसन करण्यात आलेले नाही. २४ फेब्रुवारी रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नियुक्त केलेल्या नवीन कार्यकारिणीत १२ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस व १२ चिटणीसांसह इतर पदाधिकाऱ्यांना स्थान दिले आहे. मात्र, कार्यकारिणीत यापूर्वी दोनवेळा उपाध्यक्षपदावर राहिलेल्या डाॅ. प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे. मराठवाड्यातून महिलांमधून लातूरच्या अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षित असलेल्या प्रीतम मुंडे यांना वडील गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर भाजपने लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली होती. त्यावेळी राज्यात पंकजा मुंडे या महिला व बालकल्याण, ग्रामविकासमंत्री होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही डाॅ. प्रीतम यांनाच पुन्हा निवडणुकीत उतरवले होते. या दोन्ही लोकसभा निवडणुकीत डाॅ. प्रीतम मुंडे या मोठ्या फरकाने निवडून आलेल्या होत्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही महायुतीच्या बैठकांमध्ये डाॅ. प्रीतम मुंडे यांनाच उमेदवारी देण्यावर एकमत झाले होते. परंतु ऐनवेळी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उतरवण्यात आले. मात्र, पंकजा मुंडे यांचा साडे सहा हजार मतांनी निसटता पराभव झाला. त्यांचे पुढील काही दिवसातच विधान परिषदेवर संधी देऊन राजकीय पुनर्वसन करण्यात आले. मात्र, डाॅ. प्रीतम मुंडे यांचे राजकीय पुनर्वसनही झालेले नाही आणि पक्षाच्या संघटनेवरही त्यांना स्थान न मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सध्याची कार्यकारिणीही ही राज्य पातळीवरील आहे. अद्याप केंद्रस्तरावरील कार्यकारिणीही घोषित व्हायची आहे. पक्ष बऱ्याचवेळेला मोठा विचार करतो. लवकरच डाॅ. प्रीतम मुंडे यांची दखल घेऊन पक्ष योग्य त्या जागेवर नियुक्त करेल, असा आम्हाला विश्वास आहे. – शंकर देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजप.