scorecardresearch

आंबेडकर जयंतीनिमित्त आज औरंगाबादमध्ये मिरवणुका

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी शहराच्या विविध भागातून लहान-मोठय़ा अशा शंभरपेक्षा अधिक मिरवणुका निघणार आहेत.

औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी शहराच्या विविध भागातून लहान-मोठय़ा अशा शंभरपेक्षा अधिक मिरवणुका निघणार आहेत. पोलीस विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुका काढू नयेत, असे आवाहन करताना पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी आज प्रमुख ६८ मोठय़ा, सिडको भागात १५ तर इतर लहान-मोठय़ा अशा ५५ मिरवणुकांना परवानगी दिल्याची माहिती बुधवारी पत्रकारांना दिली. जयंतीच्या पार्श्वभूमीवर बावीसशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात राहणार असून ड्रोन, सीसीटिव्हीद्वारेही लक्ष राहणार असल्याचेही पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

बंदोबस्तासाठी ३ पोलीस उपायुक्त, पाच सहायक पोलीस आयुक्त, ३१ पोलीस निरीक्षक, ७९ सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, दीड हजार महिला व पुरुष पोलीस कर्मचारी, एसआरपीएफची एक कंपनी व ४०० गृहरक्षकदलाचे जवान, असा बावीसशे पोलिसांचा ताफा तैनात करण्यात येणार आहे. शहराच्या विविध भागात १७ मनोरे उभे करण्यात आलेले आहेत असून कोणाला काही तक्रार असेल तर तत्काळ ११२ किंवा १०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही डॉ. गुप्ता यांनी केले. डीजे वाजवण्याबाबतच्या प्रश्नावर डॉ. गुप्ता यांनी सांगितले, की डीजेचा आवाज मोठा राहणार नाही याची काळजी मंडळ प्रमुखांनी घ्यावी. अनेकवेळा डीजेच्या आवाजाचा ज्येष्ठांना त्रास होतो. त्यासाठी आवाज लहान ठेवण्याच्या सूचना केलेल्या असून प्रत्येक पोलीस ठाण्याला नॉईज लेव्हल यंत्र देण्यात आलेले आहे. हे यंत्र डीजेच्या आवाजावर लक्ष ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Procession aurangabad occasion ambedkar jayanti big small more processions police department ysh