औरंगाबाद शहरातून वाहून जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी दिले जणार आहे. सांडपाणी प्रक्रियेबाबत होणाऱ्या या प्रयोगासाठी इस्रायलची मदत घेतली जाणार आहे. इस्रायल दूतावासातील कृषितज्ज्ञ व दूतावासाचे प्रतिनिधी उद्या शहरात येणार असून कृषिमंत्री एकनाथ खडसे व त्यांच्यात या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत भारत-इस्रायल सामंजस्य करारानुसार हिमायतबाग येथे सुरू होणाऱ्या केशर आंबा संशोधन केंद्राचे उद्घाटन  सोमवारी होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच इस्रायलचा दौरा केला होता. मराठवाडय़ातील दुष्काळी स्थितीवर कोणत्या व कशा उपाययोजना करता येतील, याची चर्चा इस्रायलच्या तज्ज्ञांबरोबर होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशातील तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी, यासाठी केलेल्या कराराचा भाग म्हणून राज्यात सुमारे २५ ठिकाणी संशोधन केंद्रे सुरू होणार आहेत. त्यातील एक केंद्र औरंगाबाद येथे असणार आहे. या संशोधन केंद्राच्या उद्घाटनानंतर कृषिमंत्री एकनाथ खडसे व दूतावासातील अधिकाऱ्यांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणीबाबतही चर्चा होणार आहे. मोठय़ा शहरातून वाहून जाणारे प्रदूषित पाणी ही महापालिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतात पुन्हा हे पाणी जात असल्याने आरोग्याचेही मोठे प्रश्न निर्माण होत आहेत. हे पाणी पुनप्र्रक्रिया करून शेतीला दिले तर त्याचा लाभ होऊ शकतो. हा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी ठरला, तर अन्य शहरांसाठी योजना तयार करण्याची सरकारची मानसिकता आहे. यावर उद्या चर्चा होण्याची शक्यता आहे.
मराठवाडय़ातील आत्महत्यांचा अभ्यास व्हावा म्हणून उस्मानाबाद व यवतमाळ या दोन जिल्ह्यात सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. एकूणच कृषी क्षेत्र अडचणीत असल्याने इस्रायल हा देश काही मदत करू शकतो का, याची चाचपणी होणार आहे.