औरंगाबाद : औरंगाबाद शहरासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या ६०५ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या पाणीपुरवठा योजनेचे सोमवारी महापौरांसह पदाधिकाऱ्यांसमोर सादरीकरण करण्यात आले. शहराची पुढील ३० वर्षांंची वाढीव लोकसंख्या गृहीत धरून ही योजना असणार आहे. सहा मुख्य लाईन,  ५२ जलकुंभ या योजनेत असतील. समांतर कंपनीने टाकलेली अंतर्गत जलवाहिनी वगळून नव्याने पाईप टाकण्यात येणार आहेत. या योजनेत सातारा-देवळाई भागाचाही समावेश असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिली.

शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या योजनेचे सादरीकरण झाले असले तरी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना योजनेच्या तपशिलाचा पत्ताच नव्हता. त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांच्या सूचनेनुसार आयुक्तांनी पाणी योजनेची माहिती दिली. शहरासाठी ५६ दशलक्ष लिटर व १०० दशलक्ष लिटर प्रतिदिन उपसा करणाऱ्या क्षमतेच्या दोन योजना सुरू असल्या तरी त्या जीर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे शहराला कमी पाणीपुरवठा होतो. मागणी आणि पुरवठय़ात मोठा फरक असल्यामुळे सध्या चार दिवसाआड  पाणी पुरवठा केला जात आहे. नव्या योजनेत  पहिला टप्पा पंधरा वर्षांचा राहील. या टप्प्यात शहराला ४५१ एमएलडी पाणी मिळेल. योजनेसाठी खर्च १६७३ कोटी खर्च अपेक्षित आहे. सर्वाधिक ५३३ कोटी रुपये हे मुख्य जलवाहिनीसाठी, २७३ कोटी अंतर्गत जलवाहिन्यांसाठी आणि २५४ कोटी शुद्धीकरण केंद्र व तेथून पुढे जलकुंभापर्यंतच्या वाहिन्यांसाठी लागणार आहेत.  त्यामुळे शहराची भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार लागणारे पाणी याचा अभ्यास करून नवीन योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. २०५२ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन आगामी ३० वर्षांसाठी ६०५ दशलक्ष लिटर क्षमतेची योजना राबवली जाणार आहे.

महापालिकेच्या नवीन प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेत जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत २४४० मि. मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. समान पाणी वाटपाकरिता वितरण प्रणालीत शहराचे सहा भागात विभाजन होईल. सहाही भागासाठी नक्षत्रवाडी येथून स्वतंत्र लाईनद्वारे पुरवठा केला जाईल.