छत्रपती संभाजीनगर – शहरापासून २५ किलोमीटरच्या जवळपास अंतर असलेल्या करमाडजवळील एका पेट्रोलपंपावर गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास एका महिलेचा निर्घृण खून करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावरील पंपावर भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी सध्या करमाडचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत व त्यांचे पथक दाखल झाले असून, हल्ल्याची व घटनेच्या इतर कंगोऱ्यांची माहिती घेणे सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मृत महिलेचे वय अंदाजे ३० वर्षाचे असून, तिचे नाव पूजा गावंडे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी दिली. हल्लेखोर पूजा गावंडेचा खून करून पसार झाले आहेत. पोलीस परिसरातील सीसीटिव्ही फुटेज मिळवण्याच्या प्रयत्नात असून, हल्ल्याची घटना नेमकी कोणत्या कारणावरून घडली, याचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
पूजा गावंडे ही महिला पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करत होती. गुरुवारी सकाळी रोजच्या प्रमाणे पूजा ही पेट्रोल पंपावर आली. दुपारी दीड वाजेपर्यंत तिने पेट्रोल भरण्याचे काम केले. मात्र, दुपारी वाहनातून आलेल्या व्यक्तीने पूजावर जोरदार हल्ला चढवला. यामध्ये पूजाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती करमाड पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्यासह एक पथक घटनास्थळी दाखल झाले. दुपारी तीनच्या सुमारास घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, पूजाचा कोणाशी काही कारणावरून वाद होता का ? पूजा व हल्लेखोरामध्ये नेमके नाते काय, हल्ल्यामागे काही मालमत्तेचा वाद आहे का, पूजाच्या घरात कोण-कोण आहे आदी प्रकारची माहितीही घेणे सुरू आहे. पेट्रोल पंपावरील इतर कर्मचाऱ्यांकडूनही माहिती घेण्यात येत आहेत. त्यांचेही प्रत्यक्षदर्शी म्हणून जबाब घेण्यात येण्याची शक्यता असून, या घटनेने पंपावरील इतर सर्व कर्मचाऱ्यांना धक्का बसला. पेट्रोलपंप चालकांकडूनही पूजाबाबतची माहिती घेतली जाणार असून, हल्लेखोरांच्या तपासासाठी पथके नियुक्त करून त्यांना रवाना केले जाणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.
ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलिकडच्या काळातील ही दुसरी धक्कादायक घटना आहे. यापूर्वी गौताळा अभयारण्याच्या परिसराजवळ एका सरपंच राहिलेल्या व्यक्तीचा माय-लेकाने मिळून खून केला होता. हा खून दृश्यम चित्रपट पाहून कुठलाही पुरावा राहणार नाही, अशा नियोजन पद्धतीने करण्यात आला होता. परंतु ग्रामीण पोलिसांनी हा खूनही उघडकीस आणला होता. पोलीस अधीक्षक डाॅ. विनयकुमार राठोड यांनी यासंदर्भातील माहिती दिली होती.
