अहिल्यानगर : पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीतील पाच जणांना अहिल्यानगर शहराजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ४ गावठी कट्टे, १० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अहिल्यानगरमधील लष्कराच्या गुप्तचर विभागाने या संदर्भातील माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

या कारवाईची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली. मुस्तफा ईक्राहीम शेख (वय २२, कोंढवा, आश्रमनगर, पुणे), विराट उर्फ विल्यम रवींद्र मेहंदळे (वय २६, काकडे वस्ती, कोंढवा, पुणे), समर्थ बाबासाहेब वाडकर (वय १९, काकडेवस्ती, कोंढवा, पुणे) व समर्थ राजेंद्र दूधभाते (वय १८, काकडे वस्ती, कोंढवा, पुणे) या चौघांना अटक करण्यात आली.

त्यानंतर न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर पळून गेलेला आकाश संजय पवार (रा. ब्रम्हतळे, भिंगार, अहिल्यानगर) याला आज, बुधवारी अटक करण्यात आली. आकाश पवार याच्याकडून ३ गावठी कट्टे व ९ काडतुसे जप्त करण्यात आली तर त्यापूर्वी अटक केलेल्या चौघंकडून २ गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस, कोयता, चाकू, मोबाईल जप्त करण्यात आले.

आंदेकर टोळीतील पाचजण भिंगारमधील बुऱ्हाणनगर रस्त्यावर, मिरावली पहाडाच्या पायथ्याजवळ दरोडा घालण्याच्या तयारी थांबलेले असल्याची माहिती अहिल्यानगरमधील लष्कराच्या गुप्तचर विभागाने पोलिसांना कळवली. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक कबाडी यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, गणेश धोत्रे, सुनील पवार, विष्णू भागवत, शाहिद शेख, प्रकाश मांडगे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, यांच्या पथकाने सापळा रचून त्यांना पाठलाग करून पकडले. त्यातील एकजण मोटरसायकलवर पळून गेला. त्याला नंतर अटक करण्यात आली.

आरोपींविरुद्ध पुणे व अहिल्यानगरमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.