छत्रपती संभाजीनगर – पुणे आणि परिसरात स्थिरावलेल्या आणि विस्तार करण्याचा विचार असलेल्या कंपन्यांना छत्रपती संभाजीनगरसह अन्यत्र हलवण्यात येऊ शकतात का, या दृष्टीने पुढील महिन्यात उद्योजकांचा एक मेळावा घेऊन त्यांच्याशीही चर्चा करण्याचा विचार करत आहे. पुणे शहराच्या परिसरातील जागेचे, विजेचे दर वाढलेले आहेत. परंतु काही कंपन्यांना विस्तार वाढवायचा आहे. त्यांच्याशी आपण स्वत:, उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री संजय शिरसाट पुढच्या महिन्यात येथे एक मेळावा (सेमिनार) घेऊन संवाद साधणार आहोत, असे सांगून विधान परिषदेतील उपसभापती सचिन अहीर यांनी विधानसभा व विधान परिषदेच्या सभागृहात अधिवेशनकाळात देण्यात येणाऱ्या आश्वासनांची पूर्ती होत नसल्याबद्दलचाही आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
बहुराष्ट्रीय कंपन्या आल्या, परंतु त्यांच्यासह अन्य उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी काही धोरण ठरवता येईल का, यावरही चर्चा झाली, असेही ते म्हणाले. उपसभापती सचिन अहीर यांनी ऑपरेशन टायगर, आमदारांची अस्वस्थता व गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावर मत मांडले.
अहीर पुढे म्हणाले, सभागृहात मिळालेल्या आश्वासनांची पूर्ती का होत नाही, याचा सचिव स्तरावर त्या-त्या विभागांकडून आढावा घेतला जाईल. २०२३-२५ मधील आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. अर्थात त्याची संख्या फारसी नाही. परंतु त्याच्या कारणांची माहिती पुढे येत नाही. त्याची माहिती घेतली जाईल. यासाठी सभापती आणि आम्ही मिळून एक डॅशबोर्ड तयार केलेला आहे. सभागृहातील आश्वासन, ९३ ची सूचना असेल किंवा लक्षवेधी असेल त्याबाबतची माहिती डॅशबोर्ड दिसायला हवी. या दृष्टीने नगरविकास, गृहनिर्माण विभागाचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षातील आमदार अस्वस्थ
चाकणमधील खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे यांनी येणे म्हणजे स्थानिक आमदार बाबाजी काळे यांची निष्क्रीयता दाखवणेसारखे आहे. बाबाजी काळे हे उत्कृष्टरीत्या, पोटतिडकीने प्रश्न मांडताना पाहिले आहे. आता जर नेत्यांनीच येऊन पाहणी केली तर आमदारांचेच अपयश दिसते आहे, असे सांगून सचिन अहीर यांनी विरोधी पक्षातील अनेक आमदार अस्वस्थ असल्याचे सांगितले. धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांच्याविषयी विचारेल्या प्रश्नावर त्यांनी वरील उत्तर दिले. अनेक आमदारांना भविष्यात लोक आपल्याला स्वीकारतील का, याविषयी संभ्रम आहे. एकनाथ शिंदे हे ऑपरेशन टायगर राबवत असल्याची चुकीची माहिती पसरवली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
गोपीनाथ मुंडेंची उंची कमी करण्याचा प्रयत्न
पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असे विधान केले. मुंडे हयात नसताना असे विधान करणे दुर्दैवी आहे. परंतु मुंडे यांच्या कन्या यांनी सुस्पष्ट भूमिका मांडली आहे, परंतु गोपीनाथराव यांच्या पश्चात त्यांच्याविषयी पक्षांतराविषयीचे वक्तव्य करणे हे त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न आहे का, अशी शंका येत असल्याचे मत मांडले.
