औरंगाबाद: नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची सकाळी सव्वाआकराच्या दरम्यान त्यांच्या घरासमोर गोळया घालून हत्या केली. नांदेड शहरात उत्तम उद्योजक म्हणून वावरणाऱ्या आणखीही काही जणांना खंडणीसाठी दूरध्वनी केले जात असावेत, असा पोलीसांचा कयास आहे. तो संशय पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत व्यक्तही केला. गृहमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी त्यांनी विनंती केली. अशीच विनंती अलिकडेच बीड जिल्ह्यातील सत्ताधारी पुढाऱ्यांनी विधिमंडळात केल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घ्यावी लागली. बीडनंतर नांदेडच्या घटनेने मराठवाडय़ातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न डोके वर काढता दिसत आहेत.

बीडमध्ये सार्वजिनक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याने कंत्राटदाराकडून होणाऱ्या धमक्यांमुळे बंदूक द्या, अशी मागणीच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. याच जिल्ह्यातील शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाचा गुटख्याच्या प्रकरणात सहभाग असल्याचेही स्पष्ट झाले होते. केचच्या आमदार नमिता मुंदडा यांनी त्यांना कसे गावगुंडाने छळले हे विधिमंडळात सांगितले. भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा पत्त्याच्या क्लबमध्ये असलेले संबध अशा अनेक बाबींचे धागदोरे बीड जिल्ह्यातील दिसून आले.

अंबाजोगाई येथे पोलीस उपअधीक्षक कार्यालयासमोर गोंधळ घालणाऱ्या तरुणांनी पोलीसांना मारहाण केली. तसेच युवक कॉग्रेसचे प्रदेश सचिव राहुल टेकाळे यांच्यावर संतोष पवार व इतरांनी पिस्तुल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. नांदेडमध्ये ज्या दिवशी संजय बियाणी यांची हत्या झाली त्याच दिवशी आरोपी पकडण्यास गेलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलिसांवर डोळयात तिखट टाकून हल्ला करण्यात आला.

या घटनांमुळे कायदा व सुव्यस्थेचे प्रश्न डोकेवर काढताना दिसत आहेत. खरे तर औरंगाबाद जिल्ह्यातील विशेष पोलीस महानिरीक्षकांनी काही चांगले प्रयोग करण्याचा प्रयत्नही केला. पोलीस ठाण्याचा एकच रंग दिले गेले. अगदी महिला पोलिसांकडेही तपासाचे संपूर्ण काम देऊन पाहिले. पण अंतर्गत केले जाणारे बदल अपराधींच्या मनात जरब बसविण्यात कमी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नांदेड सारख्या शहरात खंडणीसाठी अनेक उद्योजक ‘सॉफ्ट टार्गेट’ असू शकतात असे जर पालकमंत्री अशोक चव्हाण सांगत असतील तर त्यासाठी कोणती पाऊले उचलली जाणार याविषयीचे प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत.

गुटखा व मटका ही अपराध जगतातील दोन्ही व्यवहार राजरोसपणे सुरू झाले आहेत. त्यावर नियंत्रण ठेवले गेले नाही तर गुन्हेगारांची हिंमत वाढते. त्यातूनच हत्यांचे सत्र सुरू होते, अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. केले जाणारे तपास ते सिद्ध करण्यासाठी केली जाणारी उपाययोजना यावर विशेष लक्ष देण्याचीही गरज आहे. शिक्षा होण्याचे प्रमाण पोलीस ठाणे निहाय तपासणीची कार्यपद्धती पुन्हा सुरू केली तरी बराच फरक पडेल असे काही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पण बियाणी यांच्या हत्येमुळे मराठवाडय़ातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे.

स्वतंत्र बैठकीची गरज

मध्यंतरी औरंगाबाद शहरातील एका उद्योजकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. अशा घटनांमुळे मराठवाडय़ातील कायदा व सुव्यवस्थेकडे स्वत: गृहमंत्र्यांनी लक्ष घालण्याची विनंती केली जाऊ लागली आहे. करोनाकाळात मंत्र्यांच्या दौऱ्यावर काही प्रमाणात निर्बंध होते. पण आता सर्व निर्बंध शिथील झाल्यानंतर मराठवाडय़ातील प्रश्नांबाबत स्वतंत्र बैठक घेण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.

चिखलीकर अमित शहांच्या भेटीला, तर चव्हाण वळसेंच्या..

नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक बियाणी यांच्या हत्येनंतर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची आज मुंबईत भेट घेतली तर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. हत्येचा तपास व्हावा ही मागणी तर होतीच पण कायदा व सुव्यवस्थचे प्रश्न निर्माण झाले आहेत, असा संदेश सत्ताधारी आणि विरोधकांकडून दिला जात आहे. त्यामुळे पोलिसांना त्यांच्या कार्यशैलीत तातडीने बदल करणे आवश्यक बनले आहे.